हैदराबाद : जनता परिवाराच्या बहुचर्चित विलीनीकरणाची घोषणा होणे अद्याप बाकी असतानाच, आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत या परिवारासोबत आघाडी करण्यास काँग्रेस उत्सुक असल्याचे चित्र आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी रविवारी याबाबतचे संकेत दिले. बिहारात भाजपला रोखल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आपोआप कमी होईल, असेही ते म्हणाले.एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रमेश बोलत होते. जनता परिवाराच्या एकीचे आम्ही स्वागत करतो. बिहारात जनता परिवारातील पक्ष, काँग्रेस सर्वांचीच कसोटी आहे. दिल्लीतील यंदाच्या निवडणुकीत मोदींना ध्वस्त केले. दिल्लीप्रमाणे बिहारातही भाजपला रोखले जात असेल तर मोदी लाट निष्प्रभ ठरेल. त्यामुळे भाजपविरोधी शक्तींनी जनता परिवारासोबत येणे या घडीला एक योग्य घटनाक्रम आहे, असे रमेश यावेळी म्हणाले.काँग्रेसची जदयुसोबत राजनैतिक भागीदारी असेल का? या प्रश्नाला उत्तर देताना, काँग्रेसने बिहारात नितीशकुमार सरकारला पाठिंबा दिला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अविश्वास प्रस्तावाच्या वेळी आम्ही नितीशकुमार यांच्या बाजूने होतो, असे ते म्हणाले. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुका जिंकणे, हे काँग्रेसचे पुढील लक्ष्य आहे. मात्र तत्पूर्वी यावर्षी नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्याची आमची योजना आहे. बिहारात भाजपला रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व काही करण्यास आम्ही तयार आहोत. देशपातळीवरही याचा मोठा प्रभाव दिसेल, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
बिहारात काँग्रेस जनता परिवारासोबत जाणार
By admin | Published: April 13, 2015 4:41 AM