पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच या निवडणुकीवर डोळा ठेवून एकत्र आलेल्या जनता परिवाराला समाजवादी पार्टीने खिंडार पाडल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची नावही डगमगायला लागली आहे. हिंदुस्तान अवाम मोर्चा (हम) सेक्युलरचे संस्थापक जीतनराम मांझी आणि लोकजनशक्ती पार्टीचे (लोजपा) प्रमुख रामविलास पासवान या दोन दलित नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे. एक दलित नेता या नात्याने पासवान यांची काय किंमत आहे? असा सवाल मांझी यांनी उपस्थित केला असून त्यांच्यावर कुटुंबवादी राजकारणाचा आरोपही त्यांनी केला आहे.मांझी हे रालोआमध्ये ‘ट्रायल’ वर असल्याची टीका पासवान यांनी अलीकडेच केली होती. मांझी यांनी पासवान यांना प्रत्युत्तर देताना त्यांच्या या वक्तव्याने आपला अपमान झाला असल्याची भावना व्यक्त केली. १९७० पासून आपण राजकारणात सक्रिय आहोत. आमदार आणि बिहारचे कॅबिनेट मंत्री राहिल्यानंतर गेल्या वर्षी संयुक्त जनता दलाच्या सरकारमध्ये आपण जवळपास नऊ महिने मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पासवान यांच्यावर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले, अनुसूचित जातीच्या विविध समस्यांवर ते अवाक्षरही बोलत नाहीत. मग दलितांचा राष्ट्रीय नेता असल्याचा दावा कसा करतात? एवढेच नाहीतर त्यांच्या स्वत:च्या पासवान आणि दुसाध या दोन जातींचा नितीशकुमार सरकारने महादलितांमध्ये समावेश केला नाही त्यावेळीसुद्धा त्यांनी विरोध केला नव्हता; परंतु मी मुख्यमंत्री असताना या दोन्ही जातींना महादलितांमध्ये समाविष्ट केले. ही उपलब्धी लक्षात घेता केंद्रीय मंत्री पासवान यांना त्यांच्या जातीचाही नेता मानता येणार नाही. (वृत्तसंस्था)जागा वाटपाचा पेचहम सेक्युलरच्या १३ विद्यमान आमदारांबद्दल कुठलाही समझोता करणार नाही अशी अट आम्ही यापूर्वीच घातली आहे आणि बिहार विधानसभा निवडणुकीतही मावळत्या आमदारांबद्दल हाच फॉर्म्युला लागू होतो,असे मांझी यांनी स्पष्ट केले. बिहार विधानसभेत एकही आमदार नसलेला पक्ष (लोजपा) ७५ जागांवर निवडणूक लढण्याची मागणी करीत आहे. मग आमच्याकडे तर १३ आमदार आहेत. तेव्हा आम्हालाही त्या प्रमाणात जागा मिळाल्या पाहिजेत, असे माजी मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे.दरम्यान, रामविलास पासवान यांचे पुत्र आणि लोजपा संसदीय मंडळाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मांझी यांच्या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मांझी कुठल्या कारणाने आणि पार्श्वभूमीवर बोलले ते कळल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले.गेल्या लोकसभा निवडणुकीत रामविलास पासवान आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोकसमता पार्टीसोबत बाजी मारणाऱ्या भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीतही विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. संयुक्त जनता दलाने गेल्या फेब्रुवारीमध्ये नितीशकुमार यांची पुन्हा नेतेपदी निवड केल्यानंतर बंडखोरी करून हम सेक्युलरची स्थापना करणारे मांझी, लोजपा, रालोसपासोबत निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी भाजपाने केली आहे. या आघाडीत अद्याप जागा वाटपाची घोषणा झालेली नाही.पासवान आणि मी पंतप्रधानांच्या मुजफ्फरपूर आणि गया येथील जाहीर सभांमध्ये भाषण केले होते. भागलपूरच्या सभेत आमची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सर्वाधिक प्रशंसा मिळविणारा मी एकमेव नेता होतो. यावरून कोणत्या नेत्याला जनतेचा पाठिंबा आहे हे स्पष्ट होते. पासवानांना जर हे समजत नसेल तर आपण काय करू शकतो?- जीतनराम मांझी, हम (सेक्युलर)चे नेतेमांझी यांच्यासोबत आमचे चांगले व्यक्तिगत आणि राजकीय संबंध आहेत. ते रालोआत महत्त्वाची भूमिका वठवीत असून त्यांच्या सहभागाने आघाडीला बळकटी मिळाली आहे. बिहार विधानसभा निवडणुका सोबत लढविण्याची आमची इच्छा आहे.चिराग पासवान, लोजपा नेते
बिहारात रालोआची नावही दोलायमान
By admin | Published: September 09, 2015 3:14 AM