शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाबाबत देशभरातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. लोकांना या चित्रपटाचे इतके वेड लागले आहे की रिलीजच्या दिवशीच बहुतेक शो हाऊसफुल्ल होत आहेत. पण आसाममध्ये एक व्यक्ती अशी आहे की ज्याच्याकडे चित्रपटाची 120 तिकिटे असूनही तो हा चित्रपट पाहू शकला नाही. सफिदुल इस्लाम असं या शाहरूखच्या जबरा फॅनचं नाव असून या व्यक्तीला पोलिसांनी सकाळी 9.30 वाजता पकडलं आणि सायंकाळी 5 नंतर सोडून दिलं.
आसाममधील मंगलदोई जिल्ह्यातील ढोला येथील रहिवासी असलेल्या सफिदुल इस्लामने शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाची 120 तिकिटे काढली होती. ज्या दिवशी इस्लामने ही 120 तिकिटे घेतली, तेव्हा तो म्हणाला, “आम्ही हा चित्रपट पाहण्याचा प्लॅन करत होतो, परंतु जेव्हा अनेक संस्थांनी याबद्दल धमक्या देण्यास सुरुवात केली तेव्हा आम्ही ते आव्हान म्हणून घेतले. आम्ही ईशान्य अल्पसंख्याक विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी 120 तिकिटे घेतली. जर कोणी आम्हाला तिथे जाण्यापासून रोखले किंवा आम्हाला थिएटरमध्ये धमकावले तर होणाऱ्या परिणामांना आम्ही जबाबदार राहणार नाही."
बुधवारी, ज्या दिवशी चित्रपट प्रदर्शित झाला, त्या दिवशी कथेत ट्विस्ट आला. 27 वर्षीय इस्लामला ताब्यात घेण्यात आले. तो म्हणाला, "मला बोलू दिले नाही, पोलिसांनी सांगितले की हे माझ्या भल्यासाठी आहे." पोलिसांनी म्हटले आहे की त्यांनी इस्लामला ताब्यात घेतले कारण त्याने एका संघटनेला चित्रपट पाहण्यापासून रोखल्यास परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. नुकतेच बजरंग दलाने शहरातील एका सिनेमागृहाची तोडफोड करून चित्रपटाचे पोस्टर जाळले.
'पठाण'ला रिलीजच्या पहिल्याच दिवशी लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी शाहरुखचे चाहते त्याच्या गाण्यांवर नाचताना दिसले. 'पठाण'च्या 'बेशरम रंग' या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या पेहरावाच्या रंगामुळे चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली होती आणि त्यावरून बराच वादही झाला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही अनेक ठिकाणी निदर्शने आणि घोषणाबाजीच्या घटना घडल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"