नवी दिल्ली : पठाणकोट हवाईतळावर हल्ला करणाऱ्या सहा अतिरेक्यांपैकी चौघांनीच पंजाब सीमा ओलांडत घुसखोरी केली. दोन भारतीय अतिरेक्यांची त्यांना साथ लाभली असण्याची शक्यता राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) वर्तवली असली तरी या दोघांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.केवळ चार एके-४७ रायफली आढळून आल्यामुळे पाक घुसखोरांना दोन स्थानिक अतिरेक्यांची साथ मिळाल्याच्या शक्यतेला दुजोरा मिळतो. मारल्या गेलेल्या सहा अतिरेक्यांपैकी चार अतिरेकी जैश-ए- मोहम्मद (जेईएम) या संघटनेचे होते. इंटरपोलमार्फत जारी केलेल्या ब्लॅक कॉर्नर नोटीसमध्येही चौघांचाच समावेश आहे. हवाईतळावर सुरक्षा जवानांनी केलेल्या कारवाईत मारल्या गेलेल्या सहाही जणांची ओळख पटवायची आहे. पठाणकोट हवाईतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह सुमारे ३५०० जण हल्ल्याच्यावेळी या परिसरात होते.दोघे स्थानिक अतिरेकी जेईएमचे सदस्य नसण्याची शक्यता आहे. केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेने ओळख पटविण्याचे काम चालविले असून पुढील आठवड्यात अहवाल मिळू शकेल. या अहवालामुळे हल्लेखोर नेमके किती त्याबाबतचा संभ्रम दूर होईल. आम्हाला केवळ चारच शस्त्रे मिळाली आहेत. न्यायवैद्यक अहवालाची प्रतीक्षा आहे, अशी माहिती एनआयएचे महासंचालक शरदकुमार यांनी दिली.आत अडकून पडल्याची भीती?उर्वरित दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी जवानांनी हवाईतळाची एक इमारत उडवून दिली होती. त्या ठिकाणचे नमुने गोळा करण्यात आले आहे. १ जानेवारीच्या सकाळी चार अतिरेक्यांनी वायर तोडल्यानंतर ११ फूट उंच भिंत ओलांडून तळाच्या परिसरात प्रवेश केला होता. जेईएमच्या एका अतिरेक्याने हवाई तळातून आपल्या आईला फोन लावला होता. आतमध्ये अडकून पडल्याचे संकेत त्याने संभाषणातून दिले होते. पंजाबचे पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग यांच्या अपहरणानंतर अलर्ट जारी करण्यात येताच वायूदलाने हवाई सर्वेक्षण पार पाडल्यामुळे या अतिरेक्यांमध्ये घबराट पसरली असावी, असा अंदाज एनआयएने तपासातून काढला आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
पठाणकोट हल्लेखोरांना दोन भारतीयांची साथ
By admin | Published: January 21, 2016 3:19 AM