जम्मू : पठाणकोट हवाई तळालगतच्या गावांमध्ये अद्यापही अतिरेकी दडून बसले असून ते नव्याने हल्ला करू शकतात, असा सतर्कतेचा इशारा मंगळवारी गृह मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीने दिला आहे. सरकारला त्याबाबत माहिती देण्यात आली असून, सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या सुविधांसंबंधी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. समितीने काही दिवसांपूर्वी पठाणकोट हवाई तळालाही भेट दिली असून, सध्या ही समिती सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी जम्मूत आहे. संसदीय समितीच्या शिफारशीनंतर सरकारने लष्करासह सीआरपीएफ, बीएसएफला सतर्कतेचा इशारा देतानाच हवाई तळाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. सुरक्षा संस्थांना सतर्क करतानाच हवाई दलाच्या तळावरील स्थानकांची सुरक्षा लष्कराकडे सोपविली आहे. अजूनही लगतच्या गावांमध्ये अतिरेकी दडून असल्याची मिळालेली माहिती हेच त्यामागचे कारण आहे. अतिरेक्यांच्या निवासाचा शोध घेणे हे आमचे काम नसल्याचे संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष पी. भट्टाचार्य म्हणाले. (वृत्तसंस्था)
पठाणकोट हवाई तळाजवळ लपलेत अतिरेकी
By admin | Published: June 22, 2016 4:37 AM