ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १३ - पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना आज अटक केली आहे. त्याचप्रमाणे पाकमधील जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेच्या विविध कार्यालयांवर छापेमारी करत त्यांची काही कार्यालये बंद केली आहेत.
भारताकडून मैत्रीची भावना व्यक्त केल्यानंतर पाक दहशतवाद्यानी भारताच्या पठाणकोट हवाई दलावर हल्ला केला होता. भारताने पाकला काही पुरावे देऊ केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
२ जानेवारी रोजी हवाई दलाच्या तळावर झालेल्या या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय भारतीय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. भारताने पठाणकोट हल्ल्यामधील दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडे केली होती.
जर पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्यामागे असलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई केली नाही तर भारत पाकिस्तानमध्ये सचिवस्तरीय बोलणी होणार नाहीत असा इशारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिला होता.
पठाणकोट दहशतवादी हल्याची चौकशी करण्यासाठी पाकिस्तान त्यांची एक चौकशी समिती भारतात पाठवणार आहे.