शीलेश शर्मा, नवी दिल्लीसंसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही गदारोळातच पार पडण्याची चिन्हे आहेत. कारण पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच या सत्रातही केंद्र सरकारला धारेवर धरण्याचा निर्धार विरोधी पक्षांनी केला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या पुढाकाराने संपूर्ण विरोधक एकजूट होत आहेत. पठाणकोटमधील दहशतवादी हल्ला, हैदराबादेत दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी स्मृती इराणी आणि बंडारु दत्तात्रेय या मंत्रिद्वयांच्या राजीनाम्याची मागणी आणि अलिगड विद्यापीठाचे अल्पसंख्याक स्वरूप बदलण्याचा प्रयत्न या तीन मुद्यांवर सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. पावसाळी अधिवेशनात समाजवादी पार्टी विरोधकांची साथ सोडून सरकारसोबत उभी झाली होती. परंतु यावेळी मुस्लिम विद्यापीठाच्या मुद्यावर तिला विरोधकांसोबत राहणे भाग पडले असल्याचे संकेत मिळाले आहेत. काँग्रेसतर्फे दलितांशी संबंधित मुद्दे जिवंत ठेवून सातत्याने सरकारवर हल्लाबोल सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रीय जनता दल,संयुक्त जनता दल, आम आदमी पार्टी आणि डाव्या पक्षांनी सुद्धा हेच धोरण अवलंबले आहे. काँग्रेसने दलित नेता कुमारी शैलजा यांच्यानंतर शुक्रवारी मुकुल वासनिक यांना मैदानात उतरविले. वासनिक यांनी पुन्हा एकदा स्मृती इराणी, बंडारु दत्तात्रेय आणि केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू अप्पाराव यांच्या हकालपट्टीची मागणी केली. या घटनेला कुलगुरू आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. अभाविपने विद्यापीठातील ५० विद्यार्थी आणि प्राध्यापकांची एक यादी केंद्र सरकारला पाठविली असून सीबीआयमार्फत त्यांच्या चौकशीची योजना आहे. प्रकरण दाबण्यासाठी अशाप्रकारे दहशत आणि भीती पसविण्यात असल्याचा आरोप वासनिक यांनी केला.
पठाणकोट हल्ल्यावरून विरोधी पक्ष करणार सरकारची कोंडी
By admin | Published: January 23, 2016 3:30 AM