ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं वृत्तांकन करताना NDTV या हिंदी वाहिनीने अत्यंत महत्त्वाची माहिती दाखवत नियमांचा भंग केल्याचा ठपका माहिती व प्रसारण खाते ठेवत असल्याचं वृत्त आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार माहिती व प्रसारण मंत्रालया NDTV विरोधात कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे.
ज्यावेळी दोन दहशतवादी जिवंत होते आणि भारतीय सुरक्षा रक्षक व दहशतवादी यांच्यात धमुश्चक्री सुरू होती त्यावेळी इंधनाच्या टाक्यांची जागा, हवाई दलाच्या तळाची रचना आणि तिथल्या महत्त्वाच्या जागा वाहिनीवरून सांगण्यात येत होत्या. ज्यावेळी सैन्याची कारवाई संपलेली नाही, अशा वेळी महत्त्वाची माहिती न दाखवण्याचा संयम वाहिन्यांनी दाखवायला हवा असे मत एका सरकारी अधिका-याने व्यक्त केलं आहे. त्यामुळे NDTV ला अशी नोटीस बजावण्यात येणार असल्याचे या अधिका-याने सांगितले.
केबल टिव्ही नेटवर्क (रेग्युलेशन) अॅक्ट अंतर्गत कुठल्याही दहशतवादविरोधी कारवाईचं लाइव्ह प्रक्षेपण वाहिन्यांना करता येणार नाही असा प्रोग्रामिंग कोड आहे. सरकारी अधिका-यांनी दिलेल्या अधिकृत माहितीवर आधारीत ठराविक काळाने वृत्तांकन करणे अपेक्षित आहे, असंही हा अधिकारी म्हणाला. या पार्श्वभूमीवर अशी नोटीस बजावण्यात येणार आहे.
याआधीही मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचं थेट प्रक्षेपण पाकिस्तानी हँडलर्सच्या पथ्यावर पडल्याचा भारताला अनुभव असल्याचं सांगितलं जात आहे.