ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ९ - पाकिस्ताननं पठाणकोट हल्ला घडवणा-या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करायला हवी असा इशारा अमेरिकी अधिका-यांनी दिला आहे. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर पीटीआयशी बोलताना या अधिका-याने उक्ती व कृतीत अंतर ठेवता कामा नये अशी अपेक्षा केली आहे. दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन पाकिस्ताननं दिलं आहे, आता ते पाळायला हवं असं हा अधिकारी म्हणाला.
पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनांनी पठाणकोटचा हल्ला घडवून आणल्याची भारतीय गुप्तचर खात्याची माहिती आहे. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे या दहशतवाद्यांना पाकिस्ताननं पाठिशी घालता कामा नये अशी ताकीदही अमेरिकेने पाकिस्तानला दिल्याचे वृत्त आहे.
पाकिस्ताननं दिलेल्या शब्दाला जागावं आणि पठाणकोट हल्ला घडवणा-या दहशतवाद्यांवर कारवाई करावी, त्यासाठी अमेरिका पाकिस्तानला वेळ द्यायला तयार असल्याचंही या अधिका-याने स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी घेतलेल्या भूमिकेवर अमेरिकेने समाधान व्यक्त केलं आहे.
अमेरिकेचे वरीष्ठ अधिकारी पाकिस्तानच्या सरकारी अधिका-यांशी पठाणकोट हल्ल्यासंदर्भातल्या कारवाईसाठी सतत संपर्कात असल्याचं पीटीआयनं म्हटलं आहे.