पठाणकोट-
भारतातील पंजाबच्या सीमेवर पाकिस्तानकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काल मध्यरात्री पठाणकोट आणि अमृतसर सेक्टरमध्ये तीन ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न केला गेल्याची माहिती बीएसएफकडून देण्यात आली आहे. बीएसएफच्या जवानांनी सतर्कता बाळगत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.
पठाणकोटच्या सीमेवर बीएसएफच्या १२१ बटालियनला रात्री उशिरा फरईपूर येथील चौकीच्या समोर पाकिस्तानच्या जलाला भागातून घुसखोर दिसले. बीएसएफच्या जवानांनी ताबडतोड फायरिंग केली आणि घुसखोर पाकिस्तानच्या दिशेनं पळाले.
दुसरीकडे अमृतसर सीमा चौकी दाओक येथे रात्री जवळपास १० वाजताच्या सुमारास एक संशयित ड्रोन आढळून आला. बीएसएफच्या जवानांनी तातडीनं कारवाई करत ड्रोन निष्क्रिय केला. याशिवाय अमृतसरच्या पंजग्राई सीमा चौकीच्या हद्दीतही एक ड्रोन दिसून आला. त्यावर फायरिंग केली असता ड्रोन पाकिस्तानच्या दिशेनं परतला. पाकिस्तानच्या सीमेला खेटून असलेल्या पंजाबच्या या भागात आता भारतीय लष्कराकडून शोध मोहिम राबवली जात आहे. हवामानातील बदलामुळे रात्री काही ठिकाणी धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाली होती. त्यामुळे शोध घेता येत नव्हता. आता लष्कराकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्येही झाला होता घुसखोरीचा प्रयत्नयाआधी जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये सुरक्षादलानं सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. नौशेरा सेक्टरमध्ये १७ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करत होते. भारतीय सीमेत येताच भारतीय जवानांनी त्यांना सरेंडर करण्याचं आवाहन केलं होतं. पण सरेंडर न करता ते माघारी फिरत होते. यात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. १९ नोव्हेंबर रोजी दहशतवाद्याचा मृतदेह सापडला. त्याच्यासोबत दारुगोळा देखील सापडला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"