ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10- परवानगी शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वापरल्याप्रकरणी पेटीएम आणि रिलायन्सने माफी मागितली आहे. दोन्ही कंपन्यांनी परवानगी न घेता आपल्या जाहिरातीमध्ये मोदींचा फोटो वापरला होता. त्यावरून केंद्र सरकारवर मोठी टीका झाली होती. याप्रकरणी ग्राहक व्यवहार, अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने रिलायन्स आणि पेटीएमला नोटीस पाठवली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधानांच्या या निर्णयाचे कौतुक करताना पेटीएमने वर्तमानपत्रात पूर्ण पानाची जाहिरात दिली होती. तर, जिओ लाँचिंगच्या वेळी रिलायन्सने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र वापरुन जाहिरात दिली होती. ग्राहक व्यवहार, अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने पाठवलेल्या नोटिसला उत्तर देताना पेटीएम आणि रिलायन्सने माफी मागितल्याची माहिती राज्यमंत्री सी. आर. चौधरी यांनी दिली.
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी याप्रकरणी मोदींवर टीकेचा भडीमार केला होता. पेटीएमची व्याख्या सांगताना त्यांनी पे टू मोदी असं सांगितलं होतं. तर यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही जोरदार टीका केली होती. पंतप्रधान एका कंपनीचे सेल्समन झाले आहेत अशी टीका बॅनर्जी यांनी केली होती. तर, केजरीवाल यांनीही मोदींनी त्या कंपन्यांना मदत केल्याचं म्हटलं होतं.