गांधीनगर : आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेसने २४ तासांच्या आत आपली भूमिका जाहीर करावी, असा इशारा पाटीदार अनामत आंदोलन समितीने दिला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीवरून काँगे्रसचे नेते दबावात आणि व्यस्त आहेत, तर दिल्लीत चर्चेसाठी ज्या पाटीदार नेत्यांना बोलावून घेतले आहे ते नेते एकूणच परिस्थितीवर नाराज आहेत.पाटीदार समाजाचे नेते काँग्रेस नेत्यांशी चर्चेसाठी शुक्रवारीच नवी दिल्लीला गेले आहेत. पाटीदार समुदायाच्या आरक्षणाचा मुद्दाच या चर्चेत प्रमुख ठरणार आहे. तथापि, चर्चेतील कोंडी आरक्षणाच्या मुद्यावरील आहे की, पाटीदार नेते मागत असलेल्या जागांवरून आहे, ते स्पष्ट होऊ शकले नाही.पाटीदार आंदोलन समितीचे नेते दिनेश बामानिया यांनी दावा केला की, गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भारतसिंह सोळंकी यांनी सुरुवातीला त्यांच्याशी संयुक्त बैठक घेतली होती. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर विस्तृत बैठक घेण्याचे त्यांनी सांगितले होते; पण सोळंकी आम्हाला चर्चेसाठी भेटले नाहीत व फोनही घेत नाहीत.आणि ते आमचे कॉलही रिसिव्ह करीत नाहीत. हा आमचा अपमान आहे.काँग्रेसची यादी आजकाँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने आठवड्यात दोन वेळा बैठक घेऊनही अद्याप उमेदवारांच्या निवडीला अंतिम स्वरूप मिळू शकले नाही. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेसची उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादी काँग्रेससोबतगुजरात निवडणुकीसाठी आम्ही काँग्रेससोबत राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे महासचिव तारिक अन्वर यांनी दिली. गुजरातमधील नागरिकांना बदल हवा आहे. केंद्र सरकारच्या कामाबाबत लोकांमध्ये जे मत आहे ते या निवडणुकीतून व्यक्त होईल, असेही ते म्हणाले.
पाटीदारांचा काँग्रेसला २४ तासांचा अल्टिमेटम,आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 2:09 AM