जनतेवर सत्ता गाजवणे ही काही नेत्यांची सवय झाली आहे. एखाद्याचा जीव गेला तरी ते आपलं असं कर्तृत्व दाखवण्यात मागे हटत नाहीत. अशाच एका भाजपा नेत्याच्या धक्कादायक कृत्याचा व्हिडीओ तीन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील सीतापूरमधून व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका भाजपा नेत्याला हॉस्पिटलच्या गेटसमोर आपले वाहन काढण्यास सांगितले असता तो संतापला. शिवीगाळ केली आणि आपण नेता असल्याचं सांगत धमकी दिली.
"मी भाजपाचा नेता आहे, आयुष्य उद्ध्वस्त करेन...", असे त्याने एका तरुणाला सांगितले. हे प्रकरण सीतापूरच्या जिल्हा रुग्णालयाशी संबंधित आहे. येथे 1 एप्रिल रोजी भाजपा नेते उमेश मिश्रा आपली कार हॉस्पिटलच्या गेटसमोर उभी करून कुठेतरी गेले होते. दुसरीकडे वकील असलेल्या सुरेशचंद्र राठोड यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी वकिलाला लखनौला पाठवले.
"कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी”
वेळ कमी होता. त्यामुळे वकिलाच्या नातेवाईकांनी त्याला गाडीत बसवले आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडण्यास सुरुवात केली. मात्र भाजपा नेते उमेश मिश्रा यांची गाडी गेटसमोर उभी होती. वकिलाच्या नातेवाईकांनी उमेश मिश्रा यांना गेटवरून गाडी काढण्यास सांगितले असता त्यांनी त्यांच्याशी हाणामारी सुरू केली. खूप शिवीगाळ केली. भाजपा नेत्याने वकिलाचे मेहुणे जय किशन राठोड यांना तर 'मी भाजप नेता आहे, आयुष्य उद्ध्वस्त करीन' असे सुनावले. तसेच कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.
"तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करू"
तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करू, असे भाजप नेत्याने पुढे सांगितले. मी मिश्रीखब्लॉक प्रमुख रामकिंकर पांडे यांचा भाऊ आहे. मी तुला सीतापुरात राहू देणार नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी भाजपा नेते उमेश मिश्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. सध्या पोलीस याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार देत आहेत. तर दुसरीकडे मिश्रीखचे ब्लॉक प्रमुख रामकिंकर पांडे म्हणतात की ते उमेश मिश्रा नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"