Woman Doctor Attacked: कोलकातामधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची घटनेची चर्चा थांबत नाही, तोच आंध्र प्रदेशात भयंकर प्रकार घडला आहे. एका रुग्णाने प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात महिला डॉक्टर जखमी झाली असून, घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
देशभरात डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत असतानाच आता आंध्र प्रदेशात रुग्णाने डॉक्टरवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. तिरुपती येथील श्री व्येंकटेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रुग्णालयात ही घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पाठीमागून आला अन् महिला डॉक्टरचे धरले केस
सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रुग्ण महिला डॉक्टरचे केस धरतो आणि नंतर लोखंडी बेडवर डॉक्टरचे आपटतो.
डॉक्टर कामात असताना रुग्णाने पाठीमागून येऊन हा हल्ला केला. अचानक घडलेल्या घटनेने वार्डातील सगळेच घाबरले. वार्डमध्ये असलेल्या इतर डॉक्टर आणि कर्मचारी महिला डॉक्टरच्या मदतीसाठी धावले.
त्यानंतर रुग्णाच्या तावडीतून महिला डॉक्टरची सुटका केली. या हल्ल्यात डॉक्टर जखमी झाली असून, रुग्णाने हल्ला केल्याचा मानसिक धक्का बसला आहे.
हल्ल्यानंतर डॉक्टरांची निदर्शने
ही घटना घडल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी इतर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. डॉक्टरांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. हल्ला करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टरांच्या संघटनेने केली आहे.