- शीलेश शर्मा नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या प्रसारमाध्यमांत मथळे मिळवत असली तरी उत्तर प्रदेशमध्ये या रुग्णांचे खरेखुरे आकडे समोर येत नाहीत.
उच्च पदस्थ सूत्रांनुसार काही आकडे स्थानिक प्रशासनाकडून लपवले जात आहेत तर काही जण क्वारंटाईन केले जाईल या भीतीने लपून बसले आहेत. राज्यात २४ मेच्या रात्रीपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ६२६८ च्या पुढे गेली आहे. त्यापैकी १६१ जणांचा मृत्यू झाला आहे. या आकड्यांत जे कोरोनाबाधित असूनही सरकारच्या दप्तरांत नोंद नसल्यामुळे समाविष्ट नाहीत.
‘लोकमत’ने अशा काही आकड्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. गाजियाबादच्या इंद्रापूरममये असा कोरोनाबाधित रुग्ण सापडला. तो मूळचा हरयाणाचा रहिवासी. क्वारंटाईन केले जाईल या भीतीपोटी त्याने प्रशासनाशी संपर्क साधला नाही. त्याने फोनवर याला दुजोरा दिला. दुसरे प्रकरण नोएडातील सेक्टर ३६ मधील असून त्याची प्रशासनाला माहितीच नाही. तिसरे प्रकरण फिरोजाबादमध्ये एका कुटुंबातील समोर आले.