प्रशांत किशोर यांनी बिहारच्या मतदारांना एक अनोखं आवाहन केलं आहे, ज्यात त्यांनी पैसे घेऊन मतदान करणाऱ्या मतदारांना पैसे घ्या पण पैसे देणाऱ्यांना मतदान करण्याऐवजी योग्य उमेदवाराला मतदान करा असं सांगितलं आहे. मत देण्यासाठी कोणी पैसे देत असेल तर ते घ्या, कारण तो तुमचाच पैसा आहे, जो राजकारण्यांनी लुटला आहे असा टोलाही प्रशांत किशोर यांनी लगावला. तसेच विरोधी पक्षांनी दिलेला पैसा घेण्यात काही गैर नाही, कारण तो जनतेचा पैसा आहे, मात्र जनतेने मतदानाच्या वेळी आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे असंही म्हटलं आहे.
प्रशांत किशोर लोकांना म्हणाले की, विरोधक पैसे देत असतील तर ते नक्की घ्या, पण मतदानाच्या दिवशी आत जाऊन जन सुराजच्या बाजुने मतदान करा. कोणी ५०० रुपये देतील, कुणी दोन हजार रुपये देतील. मात्र हा पैसा सर्वसामान्य जनतेचा असून, इंदिरा आवास, रेशन कार्ड आणि अन्य योजनांमध्ये लाच म्हणून घेतला गेला आहे.
"नेत्यांना धडा शिकविण्याची ही संधी"
नेत्यांनी ५ वर्षे जनतेचा पैसा लुटला आणि आता तोच पैसा निवडणुकीत थोडा थोडा देऊन मतं विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेच्या विश्वासाचा गैरवापर करणाऱ्या नेत्यांना धडा शिकविण्याची ही संधी असल्याचं प्रशांत किशोर यांनी जनतेला सांगितलं. जन सुराजच्या समर्थनार्थ सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन केलं आणि जनतेच्या निर्णयानेच नवीन व्यवस्थेची आणि सुशासनाची सुरुवात शक्य असल्याचं आश्वासन दिलं.
"आता वेळ आली आहे की..."
प्रशांत किशोर यांनी लालू यादव आणि नितीश कुमार यांच्यावर थेट हल्लाबोल करताना म्हटलं की, हे लोक बिहारमध्ये ३५ वर्षांपासून सत्तेत आहेत, मात्र बिहारच्या शेतकऱ्यांना आजपर्यंत शेतीसाठी जमीन देण्यात आलेली नाही. आता वेळ आली आहे की, बिहारमध्ये एक नवीन व्यवस्था बनवायला हवी, जी प्रत्यक्षात जनतेच्या हिताला प्राधान्य देईल.