बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यामध्ये एका तरूणाला विवाहितेसोबत प्रेमसंबंध ठेवण्यासाठी भयावह शिक्षा भोगावी लागत आहे. विवाहीतेच्या पतीने जवळपास डझनभर लोकांना घेऊन तरूणाला जबर मारहाण केली, त्यानंतर त्याच्या दोन्ही डोळ्यांमध्ये असिड टाकण्यात आलं. पोलिसांनी विवाहीतेच्या पतीला अटक केली असून जखमी तरूणावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्रीची ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे. समस्तीपूर येथे राहणारा 30 वर्षीय गौतम कुमार चौधरी हा आरोपी दयाराम सिंह याच्याकडे ट्रॅक्टर चालवण्याचं काम करत होता. यादरम्यान त्याची आणि दयाराम सिंहच्या पत्नीची ओळख झाली व नंतर प्रेमात रूपांतर झालं. तेघड़ा पोलीस उप-अधीक्षक बी. के. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारी रोजी दयारामने आपल्या पत्नीचं अपहरण झाल्याची तक्रार केली. 16 फेब्रुवारी रोजी दयारामची पत्नी पोलीस स्थानकात हजर झाली, तिला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयाच्या आदेशानुसार पतीच्या घरी तिला पाठवण्यात आलं. पण 17 फेब्रुवारी रोजी दयाराम आणि त्याचा भाऊ पंकजने गौतमला तेघड़ा पोलीस स्थानकात येण्याचा खोटा फोन केला. ''दयारामच्या पत्नीला तुझ्यासोबतच राहायचं आहे असं तिने पोलिसांना सांगितलं आहे, त्यामुळे तू पोलीस स्थानकात ये'' असं त्याला सांगण्यात आलं. गौतम पोलीस स्थानकात जात असताना रस्त्यात दयाराम आणि त्याचा भाऊ पंकज सिंह यांनी डझनभर लोकांना घेऊन त्याला घेरलं. त्यानंतर दयारामचा भाऊ पंकज, चुलत भाऊ कुंदन सिंह, मनीष सिंह, प्रवीण कुमार उर्फ छोटू याच्यासह जवळपास डझनभर लोकांनी त्याच्यावर हल्ला चढवला आणि जबर मारहाण केली. त्यानंतर त्याच्या दोन्ही डोळ्यात त्यांनी अॅसिड टाकलं.
फोटो क्रेडिट -( jagran.com )