नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. प्रेमाचे अनेक भन्नाट किस्से देखील याआधी समोर आले आहेत. अशीच एक घटना आता बिहारमध्ये समोर आली आहे. अवघ्या सात दिवसांच्या ओळखीवर एका कपलने साताजन्माची गाठ बांधली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत मेव्हणीचं भाऊजींच्या भावावर प्रेम जडलं आणि विशेष म्हणजे हे लग्न खरमासमध्ये केले गेले आहे. खरमास म्हणजे या महिन्यात बिहारमध्येय हिंदू धर्मातील लोक लग्न करत नाहीत. सध्या या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
प्रेम युगुलाची ही गोष्ट पाटणाच्या जवळच्या नौबतपूर परिसरातील आहे. या लग्नात वधू ही तरुणाची मेहुणी झाली तर त्याचा भाऊच त्या वधूचा पती. दोघांना फक्त सात दिवसातच त्यांचा सात जन्माचा साथीदार मिळाला. यानंतर गावातील प्रमुख आणि सरपंच यांनी पुढाकार घेऊन गावातीलच शिव मंदिरात दोघांचे लग्न लावून दिले आणि दोघांना जोडीदार बनवले. वाढदिवसाच्या पार्टीत एकमेकांची भेट झाली होती.
करणपुरा गावातील रहिवासी मनीष कुमारच्या घरी त्याच्या भावाची मेहुणी वाढदिवसाच्या पार्टीत सात दिवस आधी दानापूरच्या नासरीगंज येथून आली होती. याचदरम्यान, या दोघांमध्ये संवाद सुरू झाला आणि हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. इतकेच नव्हे तर दोघांनी एक दुसऱ्यासाठी जगण्या-मरण्याच्या शपथा घेतल्या. यानंतर परिवारातील लोकांनी आणि स्थानिकांनी या दोघांचे प्रेम पाहिले. तसेच रात्रीच्या अंधारात दोघांना एक दुसऱ्याला भेटतानाही पकडले.
नातेवाईकातील प्रमुख आणि सरपंच यांना बोलविण्यात आले आणि मंगळवारी सकाळी कोणत्याही मुहूर्ताविना, वरात सजविण्यात आली. मंदिरातच हिंदू रितीरिवाजांनुसार पंडितांना बोलावून गाणी लावून लग्न करण्यात आले. या लग्नासाठी दोन्ही बाजूचे लोक जमले होते. 7 दिवसांचे प्रेम हे सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. तर दुसरीकडे नवरा आणि नवरी अत्यंत आनंदी आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.