पटना : बिहारमधील रोजंदारी मजुराच्या 17 वर्षांच्या मुलाला अमेरिकेत पदवीसाठी 2.5 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्याने परीक्षा दिली होती, ज्यामध्ये त्याने संपूर्ण जगात सहावा क्रमांक पटकावला आहे. आता रोजंदारी मजुराचा मुलगा अमेरिकेत शिकणार आहे. प्रेम असे या मुलाचे नाव आहे.
मेकॅनिकल इंजिनीअरिंग करण्यासाठी अमेरिकेतील लाफायेटे कॉलेजमधून त्याला अडीच कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. बिहारची राजधानी पटनाला लागून असलेल्या फुलवारी शरीफ येथील गोनपूर येथील रहिवासी प्रेम कुमार याला लाफायेटे कॉलेज अमेरिकेने ही शिष्यवृत्ती दिली आहे. या शिष्यवृत्तीसाठी भारतातून 6 नावे पाठवण्यात आली होती.
फुलवारी शरीफ येथील गोनपूर महादलित वस्तीतील झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रेम कुमार याला त्यांच्या अभ्यासाच्या जोरावर ही अडीच कोटींची शिष्यवृत्ती मिळाली आहे. प्रेम हा झोपडपट्टीतील एका अंधाऱ्या खोलीत दिवे लावून अभ्यास करायचा. आता तो अमेरिकेतील एका मोठ्या कॉलेजमध्ये शिकणार आहे. प्रेमचे वडील रोजंदारी मजूर असून 12 वर्षांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाले. रोजंदारीवर काम करूनही वडिलांनी मुलाला शिकवले.
आज अडीच कोटींची शिष्यवृत्ती मिळवणारा प्रेम हा भारतातील एकमेव तरुण ठरला आहे. आता समाज तसेच आजूबाजूचे लोक त्याचे कौतुक करत असून त्याला मिठाई खाऊ घालत आहेत. प्रेम कुमार याने सांगितले की, आम्ही खूप संघर्ष केला आहे, संघर्ष नसता तर हे यश मिळू शकले नसते, माझ्या अभ्यासादरम्यान मला ज्या काही संधी मिळाल्या त्यामध्ये मी सहभागी झालो आणि माझे ध्येय गाठले, आम्ही अत्यंत गरीब कुटुंबातून आलो आहोत. माझे वडील शेतमजूर म्हणून काम करतात आणि माझ्या आईचे निधन झाले आहे.
दरम्यान, प्रेमचे यश ऐकून कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रेमची मोठी बहीण आणि वडीलही खूप आनंदी दिसत आहेत. ही आपल्या समाजासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. तसेच, लोकांनी अभ्यास आणि मेहनत करून यश मिळवावे, मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही, असेही कुटुंबीयांनी म्हटले आहे.