नवी दिल्ली : पाटणा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, जे एका खास समुदायाच्या लोकांना प्रशिक्षण देत होते. हे प्रशिक्षण स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचा (सिमी) सदस्य अतहर परवेझ देत होता. अतहर परवेझचा भाऊ मंजर आलम याला 2013 मध्ये पाटणा येथील गांधी मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदींची हुंकार रॅली आणि बोधगया बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आली होती. तो सध्या तुरुंगात आहे.
सिमीचा अतहर परवेझ आणि मोहम्मद जलालुद्दीन यांना फुलवारी शरीफ येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या एफआयआरनुसार, यावेळीही पाटण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात हल्ला करण्याचा कट होता, तर 2013 मध्ये सिमीशी संबंधित दहशतवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीतही स्फोट घडवून आणला होता. याप्रकरणी अतहर परवेजचा भाऊ मंजर आलम याला अटक करण्यात आली आहे.
पाटणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दोघांचे संबंध पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) शी संबंधित आहेत. पोलिसांनी या दोघांकडून पीएफआयचा ध्वज, पुस्तिका, पॅम्फ्लेट आणि अनेक संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत, ज्यामध्ये 2047 पर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
हे दोघेही फुलवारी शरीफ परिसरात दहशतीची शाळा चालवत होते, असे पाटणा पोलिसांनी सांगितले आहे. अतहर परवेझ मार्शल आर्ट्स आणि शारीरिक शिक्षण देण्याच्या नावाखाली मोहम्मद जलालुद्दीनसोबत एनजीओ चालवत होता. अतहरने मोहम्मद जलालुद्दीनच्या फुलवारीशरीफ येथील नया टोला परिसरात अहमद पॅलेसमध्ये 16 हजार रुपये भाड्याने फ्लॅट घेतला होता.
अतहर परवेझ आणि मोहम्मद जलालुद्दीन हे दोघे एनजीओच्या नावाने मुलांना प्रशिक्षण देत होते. मुस्लिमांना हिंदूंविरुद्ध भडकवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. दोघेही मुस्लिम तरुणांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देत असत आणि नंतर राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर पीएफआय आणि एसडीपीआयच्या सक्रिय सदस्यांसोबत बैठका घेत असत.
पाटणा पोलिसांनी सांगितले की, 6 आणि 7 जुलै रोजी अतहर परवेझने मार्शल आर्ट्स आणि शारीरिक शिक्षण देण्याच्या नावाखाली भाड्याच्या कार्यालयात अनेक तरुणांना बोलावले, त्यानंतर त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि धार्मिक उन्माद पसरवण्यासाठी प्रवृत्त केले.