पाटणा : पायाला भिंगरी लावल्यागत सतत फिरणाऱ्या तरुणाईला रेल्वे प्रवासातही नेटविश्वातून बाहेर यावे लागू नये यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी देशातील ४०० रेल्वे स्थानकांवर मोफत आणि जलद वाय-फाय सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला खरा, पण याचा नेटवरून अश्लिल चित्रफिती (पोर्नो) डाऊनलोड करण्यासाठी बहुतांश दुरुपयोग होत असल्याचे रेल्वेला एका सर्वेक्षणावरून आढळून आले आहे.रेल्वे स्थानकांवर ‘रेलवायर’ नावाने मोफत वाय-फाय सेवा पुरविण्याचे काम ‘गूगल’च्या सहकार्याने ‘रेलटेल’ ही रेल्वेची उपकंपनी करीत आहे. या सेवेला प्रवाशांचा कसा प्रतिसाद आहे याची माहिती घेण्यासाठी ‘रेलटेल’ने अलीकडेच एक सर्वेक्षण केले. त्यात बिहारची राजधानी असलेल्या पाटणामधील रेल्वे स्टेशनवर या सेवेचा सर्वाधिक वापर होतो व यापैकी बहुतांश वापर ‘पोर्नोग्राफी’ पाहण्यासाठी केला जातो, असे आढळÞून आले.‘रेलटेल’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमच्या सेवेचा उपयोग करणारे कोणत्या प्रकारचा व किती डेटा डाऊनलोड करतात याच्या नोंदींवरून असे दिसले की, पाटणा रेल्वे स्टेशनवर या सेवेचा संपूर्ण देशात सर्वाधिक वापर होतो. येथे लोक पोर्नो साइट पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी या सेवेचा अधिक वापर करतात. यूट्यूब आणि विकिपीडियाला त्यांचे प्राधान्य असते. काही लोक अॅप्स आणि बॉलिवूडचे तसेच हॉलिवूडचे चित्रपट/गाणी डाऊनलोड करण्यासाठीही आमची सेवा वापरतात.पूर्व मध्य रेल्वेच्या दानापूर विभागात येणारे पाटणा हे देशातील एक खूप गर्दीचे रेल्वे स्टेशन आहे. येथे दररोज २०० हून अधिक गाड्या येत-जात असतात. प्रभू यांनी ही योजना जाहीर केल्यानंतर ही मोफत वाय-फाय सेवा सुरु झालेले बिहारमधील हे पहिले रेल्वे स्टेशन. सेवा सुरु होऊन जेमतेम महिना झालेला असतानाही पाटण्याने देशात अव्वल स्थान पटकाविले आहे.वाय-फाय मोफत मिळते म्हटल्यावर शहरातील टोळकी पाटणा स्टेशनवर येऊन तासनतास ठिय्या देतात, असेही आढळून आले आहे. असे असले तरी या सेवेच्या दुरुपयोगास आळा घालण्याऐवजी ही सेवा अधिक जलदगती करण्यात येणार आहे. ‘रेलटेल’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या येथील वाय-फायची क्षमता एक गिगाबाईट एवढी आहे. त्यामुळे इंटरनेट संथगतीने चालते. मोठा वापर लक्षात घेऊन ही क्षमता १० गिगाबाइट करण्यात येणार आहे. (वृत्तसंथा)>ही सेवा सुरु होणारे मुंबई सेंट्रल हे देशातील पहिले रेल्वे स्टेशन.सर्वाधिक वापराच्या दृष्टीने पाटण्यानंतर जयपूर, बंगळुरु व नवी दिल्ली या रेल्वे स्टेशन्सचा क्रमांक लागतो.तीन वर्षांत ४०० रेल्वे स्टेशन्सवर ही सेवा सुरु केली जायची आहे.या वर्षअखेरीस १०० रेल्वे स्टेशन्सवर ही सेवा सुरु झालेली असेल.सर्व स्टेशन्स पूर्ण झाल्यावर ही जगातील सर्वात मोठी सार्वजनिक स्वरूपाची वाय-फाय सेवा ठरेल.
मोफत वाय-फायवर ‘पोर्न साइट’ पाहण्यात पाटणा स्टेशन अव्वल!
By admin | Published: October 19, 2016 4:52 AM