नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2020मध्ये पुन्हा एकदा मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतल्या रामलीला मैदानात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामुळे, केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. याबाबत माहिती देत, शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांनी भाजपाला टोला लगावला. लोकांना शिक्षण, वीज अन् पाणी देणे हीच खरी देशभक्ती असल्याचे सिसोदिया यांनी म्हटले.
दिल्ली विधानसभा निवडणुकी 2015च्या निवडणुकांसारखाच यंदाही आपने मोठा विजय मिळवला. आपनं 62 जागांवर विजय मिळवलेला असून, गत निवडणुकीच्या तुलनेत 5 जागा कमी झालेल्या आहेत. भाजपाला या निवडणुकीत 8 जागाच राखता आल्या. तर काँग्रेसच्या 67 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. निवडणूक निकालाचं विश्लेषण करताना मनिष सिसोदिया यांनी भाजपवर शरसंधान साधले. ''जे लोक कामाला पसंती देतात, तेच देशभक्त असतात. सरकारचं काम लोकांच्या जीवनात सुधारणे करणे आहे, लोकांना मदत करणे आहे, नागरिकांच्या कुटुंबांना समृद्ध बनविणे आहे, म्हणजेच देशाला समृद्ध बनवणे होय. म्हणूनच, दिल्लीतील जनतेनं अपेक्षेपेक्षा जास्त सन्मान आम्हाला दिलाय, आमच्या कामाचा सन्मान केलाय,'' असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटलंय.
द्वेषाच्या राजकारणाला दिल्लीकरांनी झुगारून प्रेम आणि स्नेहाचं राजकारण स्विकारलंय. देशभक्ती म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाला उत्कृष्ट शिक्षण, आरोग्य आणि उपचार देणे होय. राष्ट्रभक्ती म्हणजे देशातील प्रत्येक कुटुंबास स्वस्त दरात आणि 24 तास वीज पुरविणे होय. लोकांना शुद्ध पाणी देणे हे सर्व करणे म्हणजेच देशभक्ती असल्याचंही सिसोदिया यांनी म्हटलंय. सिसोदिया यांनी भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाव न घेता टोला लगावला. कारण, भाजपाकडून अरविंद केजरीवाल यांना गद्दार आणि देशद्रोही असल्याचं संबोधलं जात होतं. मात्र, दिल्लीच्या जनतेनं पुन्हा एकदा केजरीवाल यांना निवडून देत, भाजपाच्या प्रचाराला नकारलंय.