महिनाभरापूर्वीच केलेल्या रस्त्याला पडले खड्डेप्रवीण साळुंके ल्ल मालेगावयेथील महानगपालिकेने मोसमपूल ते सटाणा नाका रस्ता रुंदीकरणावर ९० लाख रुपये खर्च केला आहे. या रस्त्याची दुरुस्ती होऊन महिनाही उलटला नसताना या रस्त्याला खड्डे पडल्याने या कामावर खर्च करण्यात आलेला निधी वाया गेला आहे.अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला हाताशी धरून निकृष्ट दर्जाचे काम करून निधीची वाटणी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. रस्त्याच्या कामाच्या निविदा मागविण्यासाठी देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार ९० लाख रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. एक किलोमीटरपेक्षा कमी अंतर असलेल्या त्यातच निम्यापेक्षा जास्त अंतराचे एका बाजूकडील रुंदीकरण झालेले असताना त्यावर दुरुस्तीसाठी ९० लाख रुपये खर्च हा संशोधनाचा विषय आहे. यापूर्वी महापालिकेने या रस्त्यावर दोनवेळा कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याचे रुंदीकरण न केल्याने त्या निधीचा अपहार केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. महिनाभरातच या रस्त्याला खड्डे पडल्याने ९० दिवस हा रस्ता अस्तित्वात राहील का?असा प्रश्न विचारला जात आहे. सुरुवातीपासूनच वादग्रस्त असलेले हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याची नागरिकांची ओरड आहे. अधिकाऱ्यांनी त्याकडे ‘हत्ती बाजारात चालला....’ या म्हणीप्रमाणे काणाडोळा केला होता. मालेगाव महापालिकेच्या ९० लाख रुपये खर्च केलेल्या मोसमपूल ते सटाणा नाका या रस्त्यावर महिनाभरातच पडलेले खड्डे. त्यानंतर आमदारांसह अनेक राजकीय नेत्यांनी या रस्त्याच्या कामाविषयी शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र अधिकाऱ्यांनी हे काम गुणवत्तापूर्ण होत असल्याचे वेळोवेळी सांगून ठेकेदाराची पाठराखण केली व त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत ठेकेदाराला निकृष्ट काम करण्यास मदत केल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे काम सुरू असताना एकही अधिकारी कामावर फिरकला नाही. या कामावर नव्वद लाख रुपये खर्च करण्यात आलेला असून, काम पूर्ण झाल्या झाल्याच संबंधित ठेकेदाराला पूर्ण बिल अदा करण्यात आल्याची चर्चा आहे. अधिकाऱ्यांना या रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली नसल्याची माहिती आहे. येथील महापालिकेने केलेले कोणतेही काम महिने ते दोन महिनेच टिकत असल्याचे अनेकवेळा उघड झालेले आहे. त्यावर कोणतीही चौकशी करण्यात येत नसल्याने याला आळा कधी बसणार? असा नागरिकांना प्रश्न पडला आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कधीतरी कारवाई करावी, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.
महिनाभरापूर्वीच केलेल्या रस्त्याला पडले खड्डे
By admin | Published: July 14, 2014 9:44 PM