हैदराबाद - तेलुगू चित्रपट इंडस्ट्रीजमधील अभिनेता आणि आंध्र प्रदेशमधील जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवनकल्याण यांनी भाजपासोबत आघाडी करणार असल्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेश राज्याला विशेष दर्जा मिळविण्यासाठी आपण ही हातमिळवणी करत असल्याचं पवणकल्याण यांनी म्हटलंय. यापूर्वी पवणकल्याण यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली होती.
केंद्र सरकारने राज्याला विशेष दर्जा देण्याऐवजी विशेष पॅकेज दिलंय, हे सांगताना केंद्राने वास मारणारे लाडू खाऊ घातल्याचं पवणकल्याण यांनी म्हटलं होतं. मात्र, जर मोदी सरकार राज्याला विशेष दर्जा देण्यासाठी तयार असेल, तर आपण भाजपासोबत जाण्यास तयार असल्याचं पवणकल्याण यांनी म्हटलंय. भाजपा आणि जनसेना पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी गुरुवारी विजयवाडा येथे बैठक झाली. या बैठकीला भाजपाकडून प्रभारी सुनिल दियाधर, कन्ना लक्ष्मीनारायण, जीवीएल नरसिम्हराव तर जनसेना पक्षाकडून पवणकल्याण आणि नांदेडला मनोहर उपस्थित होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पवणकल्याण यांनी दिल्लीत जाऊन भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. आंध्र प्रदेशमध्ये जनसेना पक्षाचा सध्या एकच आमदार आहे.