'मोदींचा (Modi) अर्थ' मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय, काँग्रेस प्रवक्त्यांचे वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 12:07 PM2019-03-17T12:07:46+5:302019-03-17T12:23:22+5:30
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान मोदीं (Modi) चा अर्थ मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय असा असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे
नवी दिल्ली - काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान मोदीं (Modi) चा अर्थ मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय असा असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. पवन खेडा यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटरवर मोदींबद्दल केलेल्या विधानाचा मुद्दा उचलत ट्वीट केले आहे. पवन खेडा यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ भाजपाने पोस्ट केला आहे.
MODI यांचा अर्थ मसूद अजहर, ओसामा, दाऊद आणि आयएसआय असा आहे असं एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान पवन खेडा यांनी म्हटलं आहे. भाजपाकडून पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा देखील चर्चेत सामील झाले होते. 'देशाच्या पंतप्रधानांची तुलना तुम्ही ओसामा बिन लादेनसोबत कशी करू शकता? असा प्रश्न उपस्थित करत पवन खेडा यांनी माफी मागावी' अशी मागणी संबित पात्रा यांनी केली आहे. पवन खेडा यांच्या वादग्रस्त विधानावर नेटीझन्सनी नाराजी व्यक्त केली आहे.
Congress Spokesperson Pawan Khera says that MODI stands for Masood, Osama, Dawood and ISI.
— BJP (@BJP4India) March 16, 2019
Do we need enemies like Pakistan when we have Congress? pic.twitter.com/HDHEtJIxr3
'काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी मोदी यांचा अर्थ मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय असा सांगितला आहे. आपल्याजवळ काँग्रेस असताना पाकिस्तानसारख्या दुश्मनाची गरज काय आहे?' असं भाजपाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पवन खेडा यांचे हे वादग्रस्त विधान काँग्रेस पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
रोजगारनिर्मितीतील अपयश दडवण्याचा मोदींचा प्रयत्न- राहुल गांधी
रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देण्यात आलेले घोर अपयश पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांपासून दडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला होता.
राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाच्या आकडेवारीची फेरमांडणी व राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (एनएसएसओ)ची रोजगारासंदर्भातील आकडेवारी खुली न करणे या केंद्र सरकारच्या धोरणाबद्दल जगभरातील १०८ अर्थतज्ज्ञ व समाजशास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामध्ये राकेश बसंत, जेम्स बॉईस, एमिली ब्रेझा, सतीश देशपांडे, पॅट्रिक फ्रँकोइस, आर. रामकुमार, हेमा स्वामीनाथन, रोहित आझाद आदींचा समावेश आहे. देशातील संस्थांचे स्वातंत्र्य तसे सांख्यिकी संस्थांची प्रतिष्ठा जपली जावी, असे आवाहन या नामवंतांनी केंद्र सरकारला केले होते. या अनुषंगाने राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरले होते.