सुरेश भटेवरा, नवी दिल्लीहवामानाचा अंदाज शेतकऱ्याला सर्वात अगोदर येतो. हा विशेष गुण पवारांच्या व्यक्तिमत्त्वातही आहे. राजकारणात या गुणाचा त्यांनी सर्वाधिक वापर केला. कोणालाही आपली राजकीय कारकीर्द यशस्वी करायची असेल तर पवारांकडून त्यांनी हा गुण नक्कीच आत्मसात केला पाहिजे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना अमृत महोत्सवी वर्षाच्या जाहीर शुभेच्छा दिल्या.राजधानीच्या विज्ञान भवनात आयोजित संस्मरणीय सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन, लालकृष्ण आडवाणी यांच्यासह सर्वपक्षीय राष्ट्रीय नेत्यांचे अवघे तारांगणच अवतरले होते. नेमकी हीच बाब अधोरेखित करताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, आजच्या सोहळ्यात भारतीय राजकारणातल्या तमाम प्रमुख पक्षांचे नेते पक्षभेद विसरून इथे उपस्थित आहेत, हाच भारतीय लोकशाहीचा खास पैलू आहे. विद्यमान काळ नेटवर्किंगचा आहे. राजकीय क्षेत्रात पवारांनी केलेले नेटवर्किंग नक्कीच कौतुकास्पद आहे.पंतप्रधान मोदी यांनी पवारांच्या राजकीय जीवनातील विविध पैलूंचे मिश्कील शैलीत वर्णन केले. ते म्हणाले, एक जीवन एक मिशन वृत्तीने राजकीय जीवनात पाच दशकांहून अधिक काळ शरद पवारांनी अत्यंत निष्ठेने व्रतस्थ साधना केली. बारामतीपासून दिल्लीपर्यंत त्यांच्या कार्याचा सुगंध दरवळतो आहे. याचे महत्त्वाचे कारण रचनात्मक कार्य हाच त्यांच्या कारकिर्दीचा सातत्याने केंद्रबिंदू होता व आहे. वयाची ७५ वर्षे पूर्ण करताना पवारांना जिथे जातील तिथे कर्तृत्वामुळे सलामच मिळणार आहेत. पवारांचा सर्वाधिक प्रिय विषय शेती आहे. शेती व शेतकऱ्यांच्या विकासाचा त्यांनी सतत ध्यास घेतला. त्यामुळेच कृषिमंत्री या नात्याने त्यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली. अमृतमहोत्सवी सोहळयात पवारांविषयी सोनिया गांधी नेमके काय बोलतात, याची साऱ्या सभागृहाला उत्सुकता होती. दिलखुलास शैलीत पवारांच्या व्यक्तिमत्वाचा गौरव करतांना त्या म्हणाल्या, राजकारणात दीर्घकाळ पवार काँग्रेसमधेच होते. काही कारणांनी काँग्रेसशी त्यांचे मतभेद झाले. लोकशाहीत असे घडू शकते मात्र आमच्या स्नेहल ॠणानुबंधात कधी अंतर पडले नाही. मतभेदानंतरही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचा राजकीय प्रवास एकमेकांच्या हातात हात घालूनच झाला. युपीए सरकारमधे पवारांनी जाणीवपूर्वक कृषी मंत्रालय निवडले. त्यांच्या कर्तबगारीमुळे भारतीय शेतीला चांगले दिवस आले. अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्णच झाला नाही तर गहू, तांदूळ, कापूस इत्यादी पिकांचा निर्यातक देश भारत बनला. पवारांच्या यशाचे खरे कारण त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभा पवार त्यांच्या देदिप्यमान आयुष्याच्या अँकर आहेत. कन्या सुप्रियाने भारतीय राजकारणात आजच जोरदार ठसा उमटवला आहे. पवारांचे अभिष्टचिंतन करतांना क्रिकेटच्या सेंच्युरीप्रमाणे वयाचे शतकही पवारांनी गाठावे, अशा शुभेच्छाही सोनियांनी शेवटी दिल्या.भारतीय लोकशाहीच्या आंतरिक शक्तीचे अलौकिक दर्शन साऱ्या देशाला घडवण्याची संधी या गौरव सोहळयाने उपलब्ध करून दिल्याबद्दल पवारांना धन्यवाद देत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले, संरक्षणमंत्रीपदाच्या कारकिर्दीपासून कृषी मंत्रालयापर्यंत पवारांनी प्रत्येक क्षेत्रात उमटवलेला ठसा वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतांना पवारांनी आपल्या कौशल्याने बॉम्बस्फोटांच्या मालिकेनंतर या प्रकारे मुंबईला सावरले, तेव्हा साऱ्या जगाने दाद दिली. सलाम बॉम्बे, म्हणणाऱ्या सलामांचे खरे मानकरी पवारच होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंगांनी स्व. यशवंतराव चव्हाणांच्या कारकिर्दीत पवारांशी झालेल्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देत, आर्थिक उदारीकरणाचा पवारांनी कसा ठामपणे पुरस्कार केला. कृषी मंत्री या नात्याने भारतीय शेतीचा पाया कसा मजबूत केला, याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला.शरद पवार केवळ दृढनिश्चयी नेतेच नव्हे तर अनुकरण करावे असे राजकीय मुत्सद्दी आहेत, असा पवारांचा उल्लेख करतांना उपराष्ट्रपती हमीद अन्सारी म्हणाले, शेतीपासून क्रिकेटपर्यंत, सहकारापासून शिक्षणापर्यंत आणि महिला सशक्तिकरणापासून राजकारणातल्या शिस्तीच्या आदर्शापर्यंत विविध विषय पवारांनी कौशल्यानं जपले व अनेक विषयांना आदर्श कलाटणीही दिली. राजकारणात असे अष्टपैलू नेते क्वचितच आढळतात.सोहळयाच्या सुरूवातीलाच आपल्या ५५ वर्षांच्या राजकीय व ४९ वर्षांच्या अखंड संसदीय कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेत शरद पवारांनी आयुष्यात जपलेल्या संस्कारांचा, स्व. यशवंतराव चव्हाणांचा, आपल्या आई, वडिलांचा आणि राजकीय क्षेत्रातल्या तमाम मित्रांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. सध्याच्या राजकीय-संसदीय वातावरणाकडे कटाक्ष टाकताना ते म्हणाले, चर्चेने प्रश्न सुटतात, यावर माझा गाढ विश्वास आहे. संसदीय सभागृहांचे कामकाज चालायलाच हवे, यावरही त्यांनी भर दिला. सोहळयात आपल्याविषयी इतरांनी काढलेले गौरवपूर्ण उद्गार ऐकतांना काही विशिष्ठ क्षणी पवार भावनाप्रधान झाल्यासारखे जाणवले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक खासदार प्रफुल पटेलांनी केले तर आभार खासदार सुप्रिया सुळेंनी मानले. या लक्षवेधी सोहळ्याला लालकृष्ण अडवाणी, मुलायमसिंग यादव, फारूख अब्दुल्ला, प्रकाशसिंग बादल, लालूप्रसाद यादव, सिताराम येचुरी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व्यासपीठावर तर अर्थमंत्री अरूण जेटली, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, राहुल गांधी, वसुंधरा राजे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, महाराष्ट्रातले आमदार, पत्रकार व पवारांचा विविध क्षेत्रातील मित्रपरिवार सभागृहात मोठया संख्येने उपस्थित होता.
पवार हे तर राजकीय हवामानतज्ज्ञ
By admin | Published: December 11, 2015 2:37 AM