नवी दिल्ली - पुरंदर विमानतळाच्या रखडलेल्या कामास गती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची बुधवारी दिल्लीत भेट घेतली. पुण्यातील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी पुरंदर विमानतळाचा प्रस्ताव राज्य सरकारने दिला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी पवार यांनी राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. पवारांच्या भेटीनंतर पुरंदर विमानतळाच्या कामास गती येण्याची आशा आहे. राजनाथ सिंह यांच्यासमवेत झालेल्या भेटीची माहिती देताना ट्वीटमध्ये पवार म्हणाले, पुणे शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतुकीचा भार वाढत असल्याने पुरंदर येथे नव्या विमानतळाचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने दिला आहे. प्रस्तावित विमानतळाचे काम जलद व प्राधान्याने सुरू करण्यासाठी संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली.संरक्षण सचिव व हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव देखील या बैठकीत उपस्थित होते. प्रस्तावित विमानतळाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना यंदा वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाचे संकट पुढे आले. निधीअभावीही जमीन अधिग्रहण रखडले.काही दिवसांपूर्वीच अधिग्रहणातील अडचणींचा आढावा प्रशासनाने घेतला होता. राज्य सरकारने प्रस्तावित विमानतळांच्या विकासासाठी २२५ कोटी रुपयांची पुरवणी मागणी मान्य केली. पुरंदर विमानतळाच्या वाट्याला त्यातील १५० कोटींचा निधी येणार आहे.
पुरंदर विमानतळासाठी पवार-राजनाथ सिंह चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 5:06 AM