हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटणा येथे बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते उद्धव ठाकरे यांनीही बैठकीचे निमंत्रण स्वीकारले असून ते स्वत: किंवा पक्षाचा एखादा वरिष्ठ नेता उपस्थित राहणार असल्याचे समजते.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपाचे सरचिटणीस डी. राजा, फारुख अब्दुल्ला आणि प्रमुख नेते बैठकीला येण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणण्यासाठी नितीशकुमार यांनी विविध राज्यांच्या राजधान्यांचा दौरा केला आहे.