इस्लामाबाद : काश्मीरवर भारताने घेतलेला निर्णय रोखण्यासाठी जगाने काहीही केले नाही, तर दोन्ही अण्वस्त्र सज्ज देश युद्धापर्यंत पोहोचतील, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित एका लेखात इम्रान खान यांनी म्हटले आहे की, काश्मीरवर चर्चेसाठी सर्व पक्ष विशेषत: काश्मिरींनाही सहभागी करून घ्यावे; पण काश्मीरबाबत भारताने घेतलेला निर्णय मागे घेतला तरच भारताशी चर्चा होऊ शकेल. त्यासाठी भारताने अगोदर तेथून सैन्य माघारी घ्यावे.
इम्रान खान म्हणाले की, गत आॅगस्टमध्ये आपण पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर दक्षिण आशियात शांतता निर्माण करणे ही आपली प्राथमिकता होती. मात्र, शांततेसाठी चर्चा करण्याचा मार्ग भारताकडून बंद करण्यात आला. जागतिक समुदायाने या मुद्याकडे व्यापारी संबंध आणि लाभ याच्यापलीकडे जाऊन पाहावे. काश्मीर मुद्यावर जागतिक समुदायाने काही पाऊल उचलले नाही तर, पूर्ण जगाला याचे परिणाम भोगावे लागतील. कारण, दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज आहेत, यामुळे युद्धाचा भडका उडू शकतो.जानेवारी २०१६ मध्ये पठाणकोटमध्ये पाकिस्तानच्या अतिरेक्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर या दोन देशांतील संवाद तुटलेला आहे. चर्चा आणि दहशतवाद एकाच वेळी सोबत चालू शकत नाहीत, अशी भूमिका भारताने घेतलेली आहे.