गंगटोक : सिक्कीम या राज्यातील मूळ रहिवाशांच्या लोकसंख्येत वाढ होण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी सिक्कीम सरकार आपल्या कर्मचाऱ्यांपैकी ज्यांना दोन किंवा त्याहून अधिक अपत्ये आहेत, अशा लोकांना आगाऊ तसेच अतिरिक्त वेतनवाढ देणार आहे. हा निर्णय १ जानेवारी २०२३पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणार आहे.
या राज्याचे मूळ नागरिक असल्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्र ज्यांच्याकडे आहे, अशा सरकारी कर्मचाऱ्यांपैकी दोन अपत्ये असलेल्यांना एक आगाऊ वेतनवाढ तर तीन अपत्ये असलेल्यांना दोन वेतनवाढ देण्यात येतील. ही माहिती सिक्कीमच्या कार्मिक खात्याचे सचिव रिंझिंग चेवांग भुतिया यांनी १० मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये दिली आहे. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या अपत्याचा जन्म १ जानेवारी २०२३ रोजी किंवा त्यानंतर झाला असेल, त्यांनाच वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. मूल दत्तक घेतलेल्यांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला नाही. (वृत्तसंस्था)
देशातील सर्वांत कमी जन्मदर सिक्कीममध्ये
सिक्कीममधील मूळ रहिवाशांच्या समुदायात जन्मदराचे कमी झालेले प्रमाण वाढविण्यासाठी मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी एक योजना राबविण्यात येणार असल्याचे तीन महिन्यांपूर्वी सांगितले होते.
मूळ रहिवाशांची घटत चाललेली संख्या हा त्या राज्यासाठी चिंतेचा विषय आहे. सिक्कीम हे भारतातील सर्वांत कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. तिथे सात लाख लोक राहतात.
त्या राज्यात देशातील सर्वांत कमी जन्मदर असून त्याचे प्रमाण १.१ टक्के आहे. सिक्कीममध्ये लेपचा, भाटिया आणि नेपाळी या समुदायांतील लोक मूळ रहिवासी असून त्यांची लोकसंख्या वाढावी, म्हणून प्रयत्न सुरू आहेत.