ऑनलाइन लोकमत
गोरखपूर, ३ - पगार वाढ द्यावी अन्यथा इस्लाम धर्म स्वीकारु इसा इशारा उत्तरप्रदेशमधील शिक्षकांनी दिला आहे. हिंदी व संस्कृत भाषेच्या शिक्षकांनी हा इशारा दिला असून राज्य सरकार उर्दू भाषेच्या शिक्षकांनाच पगारवाढ देत असल्याचा या शिक्षकांचा आरोप आहे.
उत्तरप्रदेमधील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील शिक्षकांनी बुधवारी गोऱखपूरमध्ये आंदोलन केले. हे शिक्षक हिंदी व संस्कृत भाषा शिकवतात. २०१४ मध्ये उत्तरप्रदेशमधील पूर्ण वेळ व अर्ध वेळ काम करणा-या शिक्षकांची पगारवाढ करण्यात आली होती. सरकारने या पगारवाढीमध्ये दुजाभाव करत उर्दू भाषा शिकवणा-या शिक्षकांना पगारवाढ दिली. पण हिंदी व संस्कृत भाषा शिकवणा-या शिक्षकांरात १२०० रुपयांची कपात करुन त्यांचे पगार थेट पाच हजार रुपयांवर आणले गेले असा आरोप या शिक्षकांनी केला आहे. आमच्या मागण्या मान्य केल्या गेला नाही तर आम्ही इस्लाम धर्म स्वीकारु असा इशाराही या शिक्षकांनी दिला आहे.
१४ सप्टेंबरला आम्ही दिल्लीतील जंतर मंतर येथेही आंदोलन करणार आहोत अशी माहिती गोरखपूरमधील शिक्षक संघटनेचे नेते दिपक दुबे यांनी दिली.