भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये जयश्री गायत्री फुड्सची मालकीण पायल मोदी यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी उंदीर मारायचं औषध पिलं त्यानंतर त्यांना बन्सल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. आत्महत्येपूर्वी पायल यांनी एक नोट लिहिली आहे. त्यात चिराग पासवान यांच्या नावाचा उल्लेख आहे त्याशिवाय ५ अन्य लोकांवर एजेन्सीद्वारे छापेमारी करण्याचा आरोप केला आहे. ईडीने त्यांच्या कंपनीवर धाड टाकल्यानंतर एक दिवसाने पायल मोदींनी जीव देण्याचा प्रयत्न केला.
ईडीच्या धाडीत ६६ कोटी संपत्ती आणि २५ लाख रोकड, लग्झरी वाहने सापडली. जयश्री गायत्री फुड्सवर लॅब सर्टिफिकेटचा गैरवापर करून बनावट दूध उत्पादन विकण्याचा आरोप आहे. जयश्री गायत्री फुड्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक किशन मोदी यांची पत्नी पायल मोदी यांनी गुरुवारी रात्री हा प्रकार केला. वेळीच त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आले परंतु त्यांची प्रकृती गंभीर आहे.
मंत्री चिराग पासवानसह अनेकांची नावं
पायल मोदी या जयश्री गायत्री कंपनीच्या संचालक आहेत. त्यांनी आपल्या नोटमध्ये चिराग पासवान यांच्याशिवाय सुनील त्रिपाठी, वेद प्रकाश पांडे, भगवान सिंह मेवाडा, चंद्र प्रकाश पांडे, हितेश पंजाबीचं नाव लिहिलं आहे. यात दावा केलाय की, हे सर्व लोक चिराग पासवान यांच्या राजकीय ताकदीचा फायदा घेत आमच्या कंपनीवर सीजीएसटी, एफएसएसएआय, ईओडब्ल्यू आणि ईडीकडून छापेमारी करायला लावली. चंद्रप्रकाश पांडे आणि चिराग पासवान नात्याने मेव्हणे-दाजी आहेत तर वेद प्रकाश पांडे आणि चंद्र प्रकाश पांडे सख्खे भाऊ आहेत.
दरम्यान, बुधवारी भोपाळ, सीहोर आणि मुरैना याठिकाणी कंपनीवर धाड टाकण्यात आली. ईडीच्या धाडीत ६६ कोटी रुपये संपत्ती आणि २५ लाख रोकडसह बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनरसारख्या लग्झरी गाड्या जप्त केल्या. ईडीने कंपनीचे ६.२६ कोटी एफडी फ्रीज केली. बनावट उत्पादन देश आणि विदेशात पुरवठा करून ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.