केरळ : केरळमधील एका आमदाराने येथील टोल नाक्यावर पैसे मागितले म्हणून गोंधळ घातल्याचे वृत्त आहे. आमदार पीसी जॉर्ज यांनी थ्रिसुर येथील टोलनाक्यावर कर्मचा-यांनी पैसे मागितले म्हणून लावलेले बॅरिकेड्स तोडले आणि कर्मचा-यांशी हुज्जत घातली. ही घटना काल (दि.17) रात्री घडली.
थ्रिसुर टोलनाक्यावरुन आमदार पीसी जॉर्ज जात असताना टोलनाक्यावरील कर्मचा-यांनी त्यांच्याकडून टोलच्या पैशांची मागणी केली. त्यावेळी आमदार पीसी जॉर्ज यांचा पार चढला आणि त्यांनी कर्मचा-यांशी हुज्जत घातली. तसेच, नाक्यावर लावण्यात आलेले बॅरिकेड्स तोडले. याबाबतचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केला असून यामध्ये आमदार पीसी जॉर्ज बॅरिकेड्स तोडताना दिसत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी पीसी जॉर्ज यांनी सांगितले की, माझी कार टोलनाक्यावर आल्यानंतर संबंधित कर्मचा-याने कारच्या समोर लावलेले एमएलए स्टिकर पाहिले. परंतू आमदाराला टोलनाक्यावर पैसे द्यावे, लागत नाही हे त्याला माहिती नसावे. मात्र, मला लवकर ट्रेन पकडायची होती म्हणून मी पैसे देऊ केले. तरीसुद्धा त्याचे लक्ष नव्हते. पाठीमागे असलेल्या वाहनातील लोक हॉर्न वाजवत होते. मी जवळपास तीन-चार मिनिटे वाट पाहिले. त्यानंतर जे काही केले ते योग्यच केले.