ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १ - जम्मू काश्मीरला अखेर मुख्यमंत्री मिळाला असून रविवारी पीडीपीचे मुफ्ती मोहम्मद सईद यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर भाजपाचे आमदार निर्मल सिंह यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली असून निर्मल सिंह यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. जम्मू काश्मीरमध्ये भाजपा पहिल्यांदाच सत्ताधारी बाकावर बसणार असून निर्मल सिंह हे जम्मू काश्मीरमध्ये मंत्रिपदी विराजमान होणारे भाजपाचे पहिले नेते ठरले आहेत.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक पार पडली होती. जनतेने त्रिशंकू कौल दिल्याने गेल्या दोन महिन्यांपासून जम्मू काश्मीरमधील सत्तास्थापनेविषयी कमालीचा गुंता निर्माण झाला. अखेर पीडीपी व भाजपा या परस्परविरोधी विचारधारा असलेल्या पक्षांनी एकत्र येत सत्तास्थापनेचा निर्णय घेतला. यासाठी दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी किमान समान कार्यक्रमावर सखोल चर्चा केली होती. या कार्यक्रमावर दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाल्यावर जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी - भाजपा अशी नवी युती उदयास आली.
रविवारी जम्मू विद्यापीठाच्या सभागृहात नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे अनेक दिग्गज नेते आवर्जून उपस्थित होते. मुफ्ती आणि निर्मल सिंह यांच्यासमवेत एकूण २५ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये फुटीरवादी नेते सज्जाद लोण यांचाही समावेश आहे. मुफ्ती हे जम्मू काश्मीरचे नववे मुख्यमंत्री असून मुफ्ती दुस-यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.