श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल काँन्फ्रन्स यांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली केल्यानंतर राज्यपालांनी अचानक विधानसभा भंग केल्याने काश्मीरमधील वातावऱण तापले आहे. दरम्यान, पीडीपी आणि नॅशनल काँन्फ्रन्स हे पक्ष पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप भाजपा नेते राम माधव यांनी केला होता. मात्र या आरोपामुळे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल काँन्फ्रन्सचे नेते ओमर अब्दुल्ला संतापले असून, त्यांनी न्यायालयात आरोप सिद्ध करण्याचे आव्हान भाजपाला दिले आहे. बुधवारी रात्री घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतरी जम्मू काश्मीरची विधानसभा भंग कण्याचा निर्णय राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी घेतला होता. त्यानंतर गुरवार सकाळपासून भाजपा आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. दरम्यान, भाजपा नेते राम माधव यांनी नॅशनल काँन्फ्रन्स आणि पीडीपीने सीमेपलीकडून मिळालेल्या सूचनेनंतर सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली केल्या असाव्यात, अशी शंका उपस्थित केली. पीडीपी आणि नॅशनल कॉन्फ्रन्स हे तेच पक्ष आहेत. ज्यांनी काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार घातला होता. त्यांना पाकिस्तानमधून तशी सूचना मिळाली होती, असा दावाही माधव यांनी यावेळी केला.
काश्मीर विधानसभेवरून रणकंदन! भाजपा, नॅशनल कॉन्फ्रन्समध्ये आरोप-प्रत्यारोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 2:57 PM