श्रीनगर : जम्मू-काश्मिरात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे़ भाजपाने काही पक्षांसोबत सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे़ या उलट निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) भाजपाकडून कलम ३७० आणि आफ्सपाविषयी हमी मागितली आहे़ पीडीपी आणि भाजपा यांच्या सत्तास्थापनेसंदर्भात गत काही दिवसांपासून बोलणी सुरू असली तरी अद्यापही त्याला यश आलेले नाही़ पीडीपी प्रवक्ता नईम अख्तर यांनी शनिवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली़ भाजपासोबत आघाडीचे संकेत देत ते म्हणाले की, आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत़ राज्यात कुठल्या पक्षासोबत मिळून सरकार स्थापन करायचे, याबाबत अद्यापही काही निर्णय झालेला नाही़ मात्र काही खास मुद्दे आमच्या अजेंड्यावर आहेत़ याबाबत आमच्या भावी घटक पक्षाने हमी द्यायला हवी़ कलम ३७० च्या सुरक्षेबाबत पक्ष कुठलीही तडतोड करू शकत नाही़ याशिवाय राज्यातून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा हटविणे व काश्मीर मुद्याच्या तोडग्यासाठी राजनीतिक प्रक्रिया सुरू करण्यासारख्या मुद्यांवरही आम्ही कटिबद्ध आहोत़ काँग्रेसनेही पीडीपीला सत्ता स्थापनेबाबत प्रस्ताव दिला आहे, त्यावरही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले़ (वृत्तसंस्था)सरकार स्थापनेबाबत बिनशर्त पाठिंबा देण्याच्या नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रस्तावाबाबत विचारले असता, आम्हाला अद्याप कुठलाही संदेश वा प्रस्ताव मिळालेला नाही, असे पीडीपी प्रवक्त्याने स्पष्ट केले़ अन्य पक्षांशी चर्चा सुरूजम्मू-काश्मिरात सरकार स्थापनेबाबत अन्य पक्षांशी चर्चा सुरू असल्याचे भाजपा सरचिटणीस राम माधव यांनी शनिवारी येथे सांगितले़ आम्हाला जनादेश मिळाला आहे़ चर्चा सुरू आहे, पुढे काय होते ते बघू, असे ते म्हणाले़