इंदोर : आज जगाला शांती आणि सद्भावनेची आवश्यकता आहे. भगवान महावीर यांच्या ध्यानाच्या मार्गातूनच हे कार्य होऊ शकते. देशसेवेसोबतच वर्तमानपत्रांच्या माध्यमातून समाजजागृती करणाºया आपल्यासारख्या व्यक्तींनाच हे कार्य करायचे आहे, या शब्दांत श्वेतांबर जैन समाजाचे आचार्य डॉ. शिवमुनीजी म.सा. यांनी सकल जैन समाजाचे अध्यक्ष, ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांना उद्बोधन केले.आचार्यश्री इंदोर येथील खेलप्रशाल येथे चातुर्मास करीत आहेत. सोमवारी विजय दर्डा यांनी आचार्यश्रींची भेट घेतली. भगवान महावीर यांनी ध्यानालाच परमात्म्याला प्राप्त करण्याचे माध्यम म्हटले होते. प्रत्येक व्यक्तीला काही वेळेसाठी ध्यान करायला हवे. विशेषत: राजकीय व सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींनी तर ध्यान करायलाच हवे, असे आचार्यश्री म्हणाले. ज्याने स्वत:च्या आत्म्याला ओळखले तो परमात्म्याला प्राप्त करतो. तुम्हीदेखील ध्यानाकडे लक्ष केंद्रित करायला हवे, असे आचार्यश्री यांनी विजय दर्डा यांना म्हटले. ध्यान शिबिरात त्यांनी दर्डा यांना समाविष्ट करून घेतले. सकल जैन समाजाचे अध्यक्ष म्हणून विजय दर्डा करीत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. नागपुरात प्रीतीसुधाजी म.सा. यांचा जो ऐतिहासिक चातुर्मास झाला, ते सकल जैन समाजासाठी अनुकरणीय उदाहरण आहे. या कार्यक्रमामुळे जैन समाजासोबतच विविध समूहांमध्ये विखुरलेल्या लोकांना एका सूत्रात बांधले. हे कार्य पुढेदेखील कायम ठेवा. आज समाजाला व देशाला मानवतेच्या एका सूत्रात बांधण्याची आवश्यकता आहे. आपल्यासारखे लोक पुढाकार घेतील, तेव्हाच हे शक्य आहे, असे उद्गार आचार्यश्री यांनी काढले.युवाचार्य डॉ. महेंद्रऋषी मुनी यांनी विजय दर्डा यांचा परिचय सांगितला. लोकमत समूहाच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची माहिती त्यांनी आचार्यश्रींना दिली. आचार्यश्री यांनी १-२ सप्टेंबरला इंदोरमध्ये आयोजित ध्यान शिबिरात येण्यासाठी विजय दर्डा यांना आग्रहाचे निमंत्रण दिले.विजय दर्डा यांनी श्वेतांबर समाजाच्या साध्वी मणिप्रभा श्रीजी यांचेदेखील दर्शन घेतले. त्या इंदोरच्या महावीरनगर येथे चातुर्मास करीत आहेत. ओजस्वी आणि प्रखर वक्ता असलेल्या साध्वी मणिप्रभा श्रीजी यांनी अनेक विषयांवर दर्डा यांच्याशी सखोल चर्चा केली.या वेळी उद्योजक चैनसिंह मोदी, उमा मोदी, कमलेश मारू हेदेखील उपस्थित होते.
ध्यानातूनच विश्वात शांती प्रस्थापित होऊ शकते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 4:07 AM