ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 02 - कारगिल युद्धात अनेक सैनिकांना देशासाठी लढतना वीरमरण आलं. पाकिस्तानसोबत झालेल्या या युद्धानंतर अनेकजण पाकिस्तानचा तिरस्कार करु लागले. मात्र कारगिल युद्धात शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना काय वाटत असेल ? त्यांच्या नेमक्या काय भावना असतील ? असा विचार कधी कोणी केला असेल का ?. नेमकी हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न कारगिल युद्धातील शहिद कॅप्टन मनदीप सिंग यांची मुलगी गुरमेहर कौरने केला आहे. गुरमेहरने फेसबुकवर 4 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामधून तिने शांततेचा संदेश दिला आहे. महत्वाचं म्हणजे गुरमेहरने एकही शब्द न बोलता आपला संदेश दिला आहे.
1999मध्ये झालेल्या कारगिल युद्धात कॅप्टन मनदीप सिंग शहीद झाले होते. त्यावेळी गुरमेहर फक्त 2 वर्षांची होती. आपल्या मनात त्यावेळी पाकिस्तान आणि मुस्लिमांविरोधात निर्माण झालेला द्वेष आणि त्यामुळे एका मुस्लिम महिलेवर केलेला हल्ला या आठवणी गुरमेहरने शेअर केल्या आहेत. माझ्या वडिलांच्या मृत्यूला मी पाकिस्तान आणि मुस्लिमांना जबाबदार मानत होते. पण माझ्या आईने माझी समजूत काढली आणि सांगितलं की याला फक्त युद्ध जबाबदार आहे इतर कोणी नाही असं गुरमेहरने सांगितलं आहे.
गुरमेहरने काहीही न बोलता फलकाच्या आधारे आपला संदेश दिला आहे. 30 फलकांचा वापर करुन तिने आपला शांततेचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
वडील असण्यापेक्षा वडील नसल्याच्या जास्त आठवणी माझ्यासोबत असल्याचं दुख:देखील गुरमेहरने व्यक्त केले आहे. पण तरीही मी माझ्या वडिलांप्रमाणे सैनिक असून दोन्ही देशांतील शांततेसाठी मी लढणार आहे. दोन्ही देशातील सरकारने फक्त आव आणण्याऐवजी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन गुरमेहरने केले आहे.