Amit Shah in West Bengal : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी(27 ऑक्टोबर 2024) पश्चिम बंगालमध्ये आयोजित पक्षाच्या सदस्यत्व नोंदणी कार्यक्रमात बोलताना बांग्लादेशातून होणाऱ्या बेकायदेशीर घुसखोरीवर तीव्र प्रतिक्रिया दिली. ही घुसखोरी थांबवली तरच पश्चिम बंगालमध्ये शांतता शक्य असल्याचे ठामपणे सांगितले. याशिवाय, त्यांनी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होण्याचा दावा केला.
शाह म्हणाले, 2026 साली भाजप प्रचंड बहुमताने पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल आणि बंगालला सोनार बांगला बनवले जाईल. बंगालला कम्युनिस्ट आणि ममता यांच्या दहशतीतून मुक्त करावे लागेल, त्यासाठी भाजपचे सरकार स्थापन करणे गरजेचे आहे. यासोबतच महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
बंगालमध्ये माता-भगिनी सुरक्षित नाहीतशाह पुढे म्हणतात, संदेशखळी, आरजी कारच्या घटनांनी हे सिद्ध होते की बंगालमध्ये आमच्या माता, बहिणी सुरक्षित नाहीत. राज्य पुरस्कृत घुसखोरी, बंगालमधील भ्रष्टाचार रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 2026 मध्ये भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी निवडून देणे. राज्य समर्थित घुसखोरी थांबवायची असेल तर 2026 मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन करावे लागेल. बंगालमध्ये रवींद्र संगीताऐवजी बॉम्बस्फोट ऐकू येतात, त्यामुळे हे थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बंगालमध्ये भाजपचे सरकार बनवणे. जे राजकारण ममता दीदींनी सुरू केले, ते 2026 मध्ये संपणार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
घुसखोरी थांबवायची असेल तर...पश्चिम बंगालमध्ये तेव्हाच शांतता येऊ शकते, जेव्हा बांग्लादेशातून होणारी बेकायदेशीर घुसखोरी पूर्णपणे थांबवली जाईल. यासाठी राज्यात भाजपचे सरकार येणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार आणि ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था यामुळे राज्यातील शांतता आणि विकासाला खीळ बसली आहे. मी बंगालच्या जनतेला 2026 मध्ये राजकीय बदल घडवून आणण्याची आणि भाजपला सत्तेत आणून राज्यात शांतता आणि सुरक्षिततेचा पाया घालण्याची विनंती करतो, असेही शाह यावेळी म्हणाले.
एक कोटी भाजप सदस्य बनवण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्ष जातीच्या आधारावर चालतात, मात्र भाजप हा एकमेव पक्ष आहे, ज्याचा सामान्य कार्यकर्ताही पंतप्रधान होऊ शकतो. लोक जेव्हा भाजपचे सदस्य होतात, तेव्हा ते या देशाला महान बनवण्याच्या आणि देशाचे रक्षण करण्याच्या संकल्पाने स्वतःला समर्पित करतात. करोडो लोकांच्या कल्याणाशी ते स्वतःला जोडून घेतात. भारत मातेला जागतिक नेता बनवण्याची शपथ घ्या. मी बंगालच्या लोकांना आणि तरुणांना भारतीय जनता पक्षाचे सदस्य होण्याचे आवाहन करतो.