नवी दिल्ली: संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून पेगासस प्रकरणावरुन प्रचंड गदारोळ माजला आहे. विरोधक याप्ररणी चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, याप्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. सुप्रीम कोर्टात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पेगासस हेरगिरी प्रकरणावर दाखल याचिकेवर सुनावणी होईल. आज(शुक्रवार) सीजेआआय एनवी रमना यांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी करण्यासाठी सहमती दर्शवली आहे.
ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शुक्रवारी मुख्य न्यायमुर्तीं रमना यांच्यासमोर पत्रकार एन.राम यांच्याकडून दाखल याचिकेचा उल्लेख केला. तसेच, पेगाससमुळे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जात असून, कोर्टाने यावर तात्काळ सुनावणी करावी, अशी मागणी केली. यानंतर रमना यांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात याप्रकरणी सुनावणी करण्यास हिरवा कंदिल दाखवला. दरम्यान, सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत न्यायालयातील एक विद्यमान आणि एक निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काय आहे पेगासस प्रकरण ?काही दिवसांपूर्वी काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी खुलासा केला होता की, इस्रायलमधील पेगाससस सॉफ्टवेअरच्या मदतीने भारतासह जगातील अनेक देशांमधील पत्रकार, नेते आणि मोठ्या व्यक्तींचे फोन टॅप करण्यात आले. भारतात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रशांत किशोर, पत्रकार एन. राम यांच्यासह अनेकांचे फोन टॅप केल्याचं त्या रिपोर्टमधून सांगण्यात आलं. ती रिपोर्ट समोर आल्यापासून विरोधक सरकारवर सतत निशाणा साधत आहेत.