इटानगर : अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळविला आहे. पेमा खांडू यांनी यापूर्वीच त्यांच्या जागेवरून बिनविरोध निवडणूक जिंकली होती. एकेकाळी काँग्रेसचे असलेले खांडू यांनी २०१६ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर २०१९ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला नेत्रदीपक विजय मिळवून दिला. आता ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद भूषवतील.
वडिलांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन२१ ऑगस्ट १९७९ रोजी जन्मलेल्या खांडू यांना राजकारणाचा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील दोरजी खांडू हे राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. ३० एप्रिल २०११ रोजी तवांग मतदारसंघाच्या भेटीवर असताना एका हेलिकॉप्टर अपघातात त्यांचे निधन झाले.हिंदू कॉलेजमधून पदवी घेतलेल्या खांडू यांनी २००० मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये जिल्हास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत विविध पदांवर काम केले. ३० जून २०११ रोजी प्रथमच ते मुक्तो मतदारसंघातून आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले. या जागेवर पूर्वी त्यांचे वडील आमदार होते. यानंतर पेमा खांडू यांचा अरुणाचल मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. २०१४ मध्ये त्यांनी पर्यटन आणि जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले. खेळांची आवड असलेल्या खांडू यांनी सत्तेत आल्यावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी खूप प्रयत्न केले.
भाजपचे दुसरे मुख्यमंत्रीत्यानंतर ते भाजपमध्ये गेले. गेगोंग अपांग यांच्यानंतर अरुणाचल प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे ते दुसरे मुख्यमंत्री बनले. यानंतर त्यांनी २०१९ मध्ये भाजपला विधानसभेत दणदणीत विजय मिळवून दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले. आता पुन्हा एकदा २०२४ मध्ये खांडू राज्याची धुरा सांभाळणार आहेत.
काँग्रेसमधून बंडखोरी करत बनविले सरकार१६ जुलै २०१६ रोजी त्यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. खांडू यांची १७ जुलै २०१६ रोजी ३७ व्या वर्षी अरुणाचलचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. पण दोन महिन्यांतच त्यांनी बंडखोरी केली. १६ सप्टेंबर रोजी, खांडू यांच्या नेतृत्वाखालील ४३ आमदारांनी काँग्रेसविरुद्ध बंड केले आणि भाजप आणि पीपीपीसोबत सरकार बनविले.