नवी दिल्ली - देशातील सर्वोच्च पदांवर विराजमान असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या देश-विदेशातील भेटींदरम्यान विविध भेटवस्तू मिळत असतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही गेल्या वर्षभरातील परदेश दौऱ्यांदरम्यान सुमारे 12.57 लाख रुपये किमतीच्या सुमारे 168 महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. या भेटवस्तूंमध्ये फाऊंटन पेन, सेलेंगर लिमिटेड पट्टीका, मो ब्लॉचे मनगटी घड्याळ, टी सेट, चिनीमातीची भांडी, मंदिर आणि चैत्यच्या प्रतिकृती, विष्णू लक्ष्मी, गणपतीचे चित्र, कालीन, बुलेट ट्रेनची प्रतिकृती, छायाचित्रे, पुस्तके आदींचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागाने दिलेल्या माहितीनुसार जुलै 2017 ते जून 2018 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना परदेश दौऱ्यांदरम्यान 168 भेटवस्तू मिळाल्या आहेत. गेल्या वर्षभरात मोदींनी इस्राइल, जर्मनी, चीन, जॉर्डन, पॅलेस्टाइन, यूएई, रशिया, ओमान, स्वीडन, ब्रिटन, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूरसह 20 देशांचा दौरा केला होता. या परदेश भेटींमध्ये मोदींना मिळालेली सर्वात महागडी भेटवस्तू ही रॉयल सेलेंगरची लिमिटेड एडिशन असलेली पट्टीका आहे. तिची किंमत 2 लाख 15 हजार रुपये आहे. तर मोदींना मो ब्लॉ च्या मनगटी घड्याळाचाही मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंमध्ये समावेश आहे. ज्याची किंमत एक लाख 10 हजार रुपये आहे. त्याशिवाय एक मशिदीची प्रतिकृती, खंजीर, म्यानासह असलेल्या दोन तलवारी, महाभारताची प्रत, योग मॅट, चांदीचा कटोरा, मुक्तीनाथ आणि पशुपतीनाथ मंदिराच्या प्रतिकृती, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या शुभंकराची प्रतिकृती असलेले खेळणे, शाल, गरूड विष्णूची धातूची मूर्ती, मफलर यासारख्या भेटवस्तू मोदींना मिळाल्या आहेत. याशिवाय अन्य अनेक वस्तूही मोदींना भेटीदाखल मिळाल्या आहेत. दरम्यान, कायद्यानुसार जेव्हा भारतीय प्रतिनिधी मंडळ परदेश दौऱ्यावर जाते तेव्हा त्यांना भेटीच्या स्वरूपात मिळणाऱ्या वस्तू तीन दिवसांच्या आत संबंधित मंत्रालयात जमा करावे लागते. या वस्तूची किंमत पाच हजाराहून अधिक असेल तर त्याची किंमत निश्चित करण्यासाठी ही भेटवस्तून परराष्ट्र मंत्रालयाच्या कोषागारात पाठवली जाते. या वस्तूची किंमत पाच हजाराहून अधिक असल्याच त्या संबंधित व्यक्तीला परत दिल्या जातात. जर किंमत अधिक असेल तर अशी वस्तू कोषागारात जमा केले जाते.
पेन, घड्याळ, मूर्ती, पुस्तके आणि बरेच काही, मोदींना वर्षभरात मिळाली एवढी महागडी गिफ्ट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 10:34 AM