नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील योगी सरकारनं लोकसंख्या नियंत्रण धोरण आणल्यानंतर आता केंद्रातही त्यादृष्टीनं हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसंख्या नियंत्रण कायदा तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ६ ऑगस्टला यासंदर्भात राज्यसभेत चर्चा होईल. भाजप खासदार राकेश सिन्हा यांनी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात खासगी सदस्य विधेयक मांडलं आहे. यावर ६ ऑगस्टला चर्चा अपेक्षित आहे. राज्यसभा खासदार असलेले अनिल अग्रवाल यांनीदेखील याबद्दलचं विधेयक मांडलं आहे.
गोरखपूरचे खासदार रवी किशनदेखील लोकसंख्या नियंत्रणाबद्दल खासगी विधेयक मांडणार आहेत. रवी किशन सध्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गावी आले आहेत. खासगी सदस्य विधेयक २३ जुलै संसदेच्या पटलावर सादर करण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली. संसदेचं पावसाळी अधिवेशन १९ जुलैला सुरू होईल. ते १३ ऑगस्टपर्यंत चालेल. यामध्ये १९ दिवस कामकाज चालेल.
गोरखपूरचे खासदार रवी किशन लोकसंख्या नियंत्रणाबद्दल विधेयक मांडणार असल्याची माहिती पुढे येताच सोशल मीडियावर त्यांच्याच कुटुंबाची चर्चा रंगली. लोकसंख्या नियंत्रणाचा आग्रह धरणाऱ्या रवी किशन यांनाच ४ मुलं आहेत, याकडे अनेकांनी लक्ष वेधलं. काहींनी रवी किशन यांचा कुटुंबासोबतचा फोटो ट्विट केला, तर काहींनी या परिस्थितीला दिव्याखाली अंधार म्हणत खिल्ली उडवली.
तीन मुली आणि एक मुलगा असणारी व्यक्ती लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार, हाच मोठा विनोद आहे, असा टोला काहींनी लगावला आहे. काहींनी थेट लोकसभेच्या संकेतस्थळावरून रवी किशन यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्रच शोधून काढलं. त्यात किशन यांनी त्यांच्या अपत्यांची माहिती दिली आहे. यामध्ये एका मुलासह तीन मुलींचा उल्लेख आहे. त्यामुळे रवी किशन सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. याआधी रवी किशन भोजपुरी गाण्यांमधील अश्लिलता रोखण्याची मागणी केल्यामुळे ट्रोल झाले होते. रवी किशन यांनीच अनेक गाण्यांमध्ये काम केलं असून त्यात बरीच अश्लिलता होती, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. त्यात अनेकांनी रवी किशन यांचे भोजपुरी गाण्यातील फोटोही ट्विट केले होते.