ठळक मुद्देविकासाच्या सीडीमध्ये लोकांना जास्त रसनेत्यांमध्ये जोरदार आरोपप्रत्यारोप सुरू हार्दिक पटेलच्या प्रचारसभेत मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. प्रचार सभांच्या माध्यमातून गुजरातमध्ये रणांगण पेटले असताना, आता सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. पाटीदार नेता हार्दिक पटेल याचे कथित सेक्स व्हिडीओ सध्या गुजरातमधील राजकीय वादविवादाचा विषय बनले आहेत. दरम्यान, या सेक्स सीडी प्रकरणानंतर हार्दिक पटेलच्या प्रचारसभेत मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे असे सांगण्यात येत आहे की, या सेक्स सीडीचा हार्दिक पटेलला काहीही फरक पडत नाही.
मंगळवारी भरुच येथे हार्दिक पटेलने प्रचारसभा घेतली. यावेळी या प्रचारसभेला अनेक लोकांनी हजेरी लावली होती. यावर हार्दिक पटेलने ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. गुजरातमधील लोकांना सेक्स सीडीपेक्षा गुजरातच्या 22 वर्षांच्या विकासाची सीडी पाहण्यास जास्त रस आहे, असे ट्विट हार्दिक पटेलने केले आहे. दरम्यान, सेक्स सीडीनंतर त्याची प्रतिमा खराब होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, असे न होता हार्दिक पटेलच्या प्रचारसभांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हार्दिक पटेलने आपल्या प्रचारसभेत सेक्स सीडीबाबत किंवा भाजपासंबंधी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, तो म्हणाला की, मी चुकलो असेन, पण विरोधकांकडून संधी मिळताच मला संपविण्यात सुद्धा येईल. मात्र, आरक्षण आणि पाटीदार समाजावर होणा-या अत्याचाराविरोधात मी सतत लढत राहणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसांचाच अवधी राहिला असताना निवडणुकीतील प्रचाराची पातळी घसरली आहे. हार्दिक पटेलच्या विरोधकांकडून त्याचे चारित्र्य हनन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून हार्दिक पटेलचे कथित सेक्स व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. दरम्यान, व्हायरल करण्यात आलेल्या चार व्हिडीओ क्लीपपैकी एका क्लीपमध्ये हार्दिक पटेल हा मुंडन आंदोलनामध्ये मुंडन केल्यानंतर मौजमजा करताना दिसत आहे. पाटीदार आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्यांना आदरांजली वाहून गुजरात सरकारचा निषेध करण्यासाठी हार्दिक पटेलसह पाटीदार नेत्यांनी मुंडन केले होते. याप्रकरणी हार्दिक पटेल याला जिग्नेश मेवानी याची साथ मिळाली आहे. जिग्नेश याने सेक्स हा मुलभूत हक्क असून, कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात डोकावणे योग्य नसल्याचे म्हटले होते. तर हार्दिक पटेलने या प्रकाराचा पाटीदारांच्या आरक्षणाच्या मागणीवर आणि आंदोलनावर काहीही परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे. मंगळवारी हार्दिक पटेलची एक सेक्स सीडी व्हायरल झाली होती. या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि दोन तरुणी दिसत आहेत. हार्दिक पटेल याची एका महिलेसोबतचा कथित व्हिडीओ सोमवारी प्रसारित झाला होता. त्यानंतर वातावरण तापलेले असतानाच दुसरा व्हिडीओसुद्धा लीक झाला. या व्हिडिओमध्ये असलेला तरुण हार्दिक पटेल असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, हार्दिक पटेलच्या कथित सीडी प्रकरणामुळे गुजरातचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.