नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकतेच 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, 2000 रुपयांच्या नोटा 23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत लोक बदलून किंवा बँकेत जमा करू शकतात, असेही सांगण्यात आले आहे. मात्र, आता याबाबत उलट चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता लोकांनी कॅश ऑन डिलिव्हरीवर ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवायला सुरुवात केली आहे आणि त्याचे पैसे 2000 रुपयांच्या नोटांनी द्यायला सुरुवात केली आहे.
ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने (Zomato) एक महत्त्वाची गोष्ट समोर आणली आहे. आरबीआयने 2000 च्या नोटा चलनातून बंद केल्याची घोषणा केल्यानंतर कंपनीने हा खुलासा केला आहे. झोमॅटोने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये कंपनीने माहिती दिली आहे की, शुक्रवारपासून 72 टक्के कॅश ऑन डिलिव्हरीची ऑर्डर 2000 रुपयांच्या नोटाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सोमवारी सांगितले की, 2000 रुपयांच्या बदलण्यासाठी बँकेत गर्दी करण्याची गरज नाही. कारण अंतिम कालावधीसाठी अजून चार महिने बाकी आहेत. तसेच, आरबीआय या प्रक्रियेत येणाऱ्या सर्व समस्यांबाबत संवेदनशील असणार आहे. याशिवाय, गव्हर्नर म्हणाले की 2000 रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याचा निर्णय हा आरबीआयच्या चलन व्यवस्थापन कार्याचा एक भाग आहे आणि तो स्वच्छ नोट धोरणाशी सुसंगत आहे.
याचबरोबर, गव्हर्नर म्हणाले की 2000 रुपयांच्या बँक नोटा प्रामुख्याने चलनातून बाद झालेल्या नोटांची भरपाई करण्यासाठी सादर करण्यात आल्या होत्या आणि हा उद्देश पूर्ण झाला आहे. तसेच, 23 मे पासून नोटा बदलण्याची किंवा जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. दुसरीकडे, स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आयडी प्रूफ, डिमांड स्लिपची आवश्यकता नाही, तर एकावेळी जास्तीत जास्त 10 चलनी नोटा (20,000 रुपये) बदलता येतील.