अहमदाबाद : जातींची अस्तित्वात आलेली नवी आघाडी आणि हार्दिक पटेल यांनी उभे केलेले आव्हान याबरोबरच २२ वर्षांच्या अखंड सत्तेमुळे राज्यातील भाजपा सरकारविषयी लोकांमध्ये नाराजी आहे, असे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मान्य केले आहे. मात्र भाजपा १८२ जागांच्या विधानसभेत १५० जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.ग्रामीण भागात पटेल समुदाय नाराज आहे आणि पिकांना आधारभूत भावाचाही प्रश्न आहे. नागरी भागांत वस्तू आणि सेवा कर, नोटाबंदीसारखे प्रश्न आहेत. यामुळे भाजपाला जोरदार संघर्ष करावा लागतोय असे तुम्हाला वाटते का, यावर शाह म्हणाले की, मला तसे वाटत नाही. काँग्रेसने राज्यात भाजपाला आव्हान उभे केल्याचे चित्र आहे. तुम्ही त्याचा कसा प्रतिकार करणार, असे विचारले असता शहा म्हणाले की, असे तर्क सर्वच निवडणुकांत पसरवले जातात परंतु मागे भाजपा तीनचतुर्थांश बहुमताने विजयी झाला आहे. १९९५पासून गुजरातची जनता भाजपाला पाठिंबा देत आहे. विकासाचा कार्यक्रम पुढेही सुरू ठेवण्यासाठी राज्यातील जनतेने आमच्यावर पुन्हा विश्वास टाकावा, असे मी आवाहन करतो.मोदी पंतप्रधान बनल्यानंतर सकारात्मक, अनुकूल बदल घडले, मोदी यांनी राज्याच्या विकासासाठी पुढाकार घेतला, असे उत्तर त्यांनी दिले.काँग्रेसने गुजरातेत जातींचे राजकारण लादण्याचा प्रयत्न केला आहे आणि पूर्वीही केला होता. खाम (क्षत्रिय, हरीजन, आदिवासी, मुस्लीम) प्रयोग काँग्रेसने केला. त्यामुळे लोक अनेक वर्षे भरडून निघाले. अनेक जातींत संघर्ष उडाले, कित्येक महिने संचारबंदी लावली गेली होती, अनेक जणांचे प्राण गेले आणि विकासाचा कार्यक्रम थांबला, असेही ते उत्तरले.
लोकांमध्ये नाराजी आहे; तरीही आम्हीच जिंकू, अमित शहा यांचा विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 4:22 AM