ऑनलाइन लोकमत
बिजींग, दि. 12 - तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला परवानगी दिल्यापासून सातत्याने चीनकडून भारतावर आगपाखड सुरु आहे. भारताने अरुणाचल प्रदेशवर अतिक्रमण केले असून, भारताच्या बेकायदा राज्यात अरुणाचलमधील जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे असे चीनी वर्तमानपत्राने आपल्या लेखात म्हटले आहे.
दलाई लामा यांच्या अरुणाचल दौ-यात प्रामुख्याने तवांग भेटीला चीनचा प्रखर विरोधत होता. तवांगचा प्रदेश दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. भारताच्या बेकायदा राज्यात दक्षिण तिबेटमधील लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. तेथील जनतेला भेदभावपूर्ण वागणूक दिली जात असून, तेथील लोकांना चीनमध्ये परतायचे आहे अशी चिथावणीखोर भाषा अग्रलेखात वापरण्यात आली आहे.
चीनच्या अत्याचारी राजवटीविरोधात वेळोवेळी तिबेटमध्ये निदर्शने सुरु असतात. आतापर्यंत 120 जणांनी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधात आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे मात्र याकडे अग्रलेखात दुर्लक्ष करण्यात आले आहे. दलाई लामा यांच्या अरुणाचल भेटीवरुन चीनने आतापर्यंत भारताला अनेक इशारे दिले आहेत. भारत-चीन व्दिपक्षीय संबंध खराब होतील असेही चीनने म्हटले आहे.
तवांगवरुन चीनचा मुख्य आक्षेप आहे. तवांग सहाव्या दलाई लामांचे जन्मस्थान आहे. दरम्यान चीनने माझ्या भविष्याची चिंता करु नये असे दलाई लामा यांनी म्हटले आहे. आपल्या भविष्याचा निर्णय अनुयायी करतील चीन नाही असं स्पष्ट केलं आहे. दलाई लामा यांनी चीनचं नाव न घेता आपल्यानंतर आपलं पद कायम राहणार की नाही हे माझे अनुयायी ठरवतील दुसरं कोणी नाही असं म्हटलं आहे. दलाई लामा यांनी चीनवर निशाणा साधला असून दलाई लामांच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. दलाई लामांनी चीनच्या दाव्याला फेटाळत खडे बोल सुनावले आहेत.