भागलपूर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ‘डीएनए’मध्येच काही गडबड आहे, असे सांगून विरोधकांची टीका ओढवून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न केला. ‘डीएनए’ या शब्दाचा उल्लेख न करता बिहारमधील लोक भारतातील सर्वाधिक बुद्धिमान लोक आहेत, असे सांगत त्यांनी या वादावर आपले स्पष्टीकरण देण्याचे प्रयत्न केले. याचवेळी नितीशकुमार, लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या महाआघाडीवर जोरदार हल्ला चढवला.बिहारची ‘सिल्क सिटी’ भागलपूर येथे आपल्या निवडणूकपूर्व चौथ्या ‘परिवर्तन रॅली’त मोदी बोलत होते. भारतात सर्वाधिक कुशाग्र बुद्धिमत्तेचे लोक कुठे आहेत, तर ते बिहारच्या भूमीवर आहेत. म्हणूनच सत्तालोलुपांचा राजकीय खेळ ते समजून चुकले आहेत. कितीही पक्ष, कितीही नेते, कितीही भ्रम, कितीही फसवणूक व दिशाभूल केली तरी बिहारची जनता भुलणारी नाही. बिहारला आता राजकारण नको तर विकास हवा आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. त्यांचा इशारा नितीशकुमार, लालूप्रसाद यादव आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीकडे होता. (वृत्तसंस्था)
बिहारमधील लोक भारतात सर्वाधिक बुद्धिमान
By admin | Published: September 01, 2015 11:15 PM