मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी विधानसभेच्या 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तारखांची घोषणा केली. त्यानुसार, बिहारमधील विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात होणार असून 28 ऑक्टोबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. तर, निवडणुकांचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर बिहारचे भाजपा प्रभारी महाराष्ट्राचे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विजयाबद्दल आशावाद व्यक्त केला आहे.
बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होईल, असा आशावाद व्यक्त केलाय. जगात पहिल्यांदाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एवढा मोठा निवडणुकीचा कार्यक्रम पार पडणार आहे. बिहारच्या नागरिकांची मोदींवर श्रद्धा आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री नितीशकुमार आणि सुशील मोदी यांनी लोकांसाठी काम केलंय. त्यामुळे, बिहारमध्ये पुन्हा एकदा एडीएचं सरकार निवडून येईल, असे फडणवीस यांनी म्हटले. बिहार निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी विजयी आशावाद व्यक्त केला.
दरम्यान, लोकमत’शी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बिहार निवडणुकीसाठी भाजपाने आपल्याला प्रभारी केले आहे. लोकांना असे वाटत आहे की, हा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश आणि महाराष्ट्रातून निरोप आहे. यापूर्वी अरुण जेटली आणि अनंत कुमार यांच्यासारखे नेते ही जबाबदारी सांभाळत होते. दोन-तीन वर्षांत आम्ही असे अनेक नेते गमावले. पक्ष आता नवी टीम तयार करीत आहे. त्यादृष्टीनेच पक्षाने माझी निवड केली आहे. मी विरोधी पक्षनेता तर आहेच. त्यामुळे महाराष्ट्र सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा मुद्दा लोकांच्या विचारांचा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पूर्वी राज्याच्या एखाद्या नेत्याला मोठी जबाबदारी मिळाली तर सर्व पक्षांचे नेते खूश होत असत की, आपल्या राज्यातील एक व्यक्ती मोठी होत आहे. आजकाल संकुचित मानसिकता आहे; पण त्यांच्या विचारांमुळे काही फरक पडत नाही. राष्ट्रीय राजकारणात जाण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्रात माझे खूप राजकारण अद्याप बाकी आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
बिहार निवडणुकीबाबत राऊत म्हणाले
'कोरोनामुळे देशात अभूतपूर्व परिस्थिती आहे. सध्या लोकांना निवडणुका नकोत, तर काम हवंय. निवडणुका घेण्यासारखी स्थिती बिहारमध्ये आहे का?, याचा विचार व्हायला हवा. कोरोना संपला असेल, तर मग निवडणूक आयोगानं तसं जाहीर करायला हवं,' असं राऊत म्हणाले. 'विकासाचे मुद्देच नसल्यानं सुशांत सिंह राजपूतच्या नावावर बिहारमध्ये भावनिक मुद्दे तापवले जात आहेत. सुशांत हाच तिथे प्रचाराचा मुद्दा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानं पोस्टरदेखील छापले आहेत,' अशा शब्दांत राऊत यांनी बिहारच्या राजकारणावर भाष्य केलं.
मतदानासाठी आणखी एक तासाचा कालावधी
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोरोनामुळे नवीन सुरक्षा नियमांनुसार निवडणुका घेण्यात येतील. मतदान केंद्रावर मतदारांची संख्या कमी असेल. एका बूथवर एक हजार मतदार असतील. तसेच यावेळी बिहार निवडणुकीत एक लाखांहून अधिक मतदान केंद्रे असतील. यावेळी मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे. बिहार निवडणुकीत मतदानासाठी आणखी एक तासाचा कालावधी ठेवण्यात आला आहे. म्हणजेच सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होईल. मात्र नक्षलग्रस्त भागात असं होणार नाही. तसेच शेवटच्या तासात कोरोनाचे रुग्ण मतदान करू शकतील"
6 लाख पीपीई किट, 46 लाखांहून अधिक मास्क आणि सॅनिटायझर्स
"कोरोनाच्या संकटात राज्य निवडणूक आयोगाला 6 लाख पीपीई किट देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त, निवडणुकीत 46 लाखांहून अधिक मास्क आणि सॅनिटायझर्सचा वापर केला जाणार आहे. पक्ष आणि उमेदवारांना व्हर्च्युअल निवडणूक प्रचार करावा लागणार आहे. कोरोनामुळे मोठ्या जाहीर सभा घेतल्या जाणार नाहीत. तसे उमेदवारीसाठी दोनपेक्षा जास्त वाहने कोणत्याही उमेदवारासह येऊ शकत नाहीत" अशी माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे.
कोविड रुग्णही करतील मतदान
कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करतच बिहारमधील विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली असून तीन टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे. मात्र, कोविड रुग्णांना या निवडणुकीत मतदान करता येईल का? त्यांनी कसं मतदान करायचं? यांसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कोविड रुग्णांसाठी मतदानाची वेळ निश्चित केली आहे. कोरोना रुग्णांसाठी मतदानाची स्वतंत्र व्यवस्था असून मतदान केंद्रावर शेटवच्या क्षणी ते मतदानाचा हक्क बजावतील. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन एका मतदान केंद्रावर एक हजार मतदारांनाच मतदान करता येणार आहे.