राहुल गांधींच्या कर्नाटक दौ-यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 05:49 PM2018-02-27T17:49:18+5:302018-02-27T17:49:18+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कर्नाटक दौ-यावर आहेत
बेळगाव - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कर्नाटक दौ-यावर आहेत. जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करत प्रचार करत आहेत. राहुल गांधी यांनी बेळगावमध्येही रोड शो केला. यावेळी राहुल गांधींचा ताफा रामदुर्ग शहराजवळून जात असताना रस्त्याशेजारी त्यांची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच भंबेरी उडालेली पहायला मिळाली. नरेंद्र मोदींच्या नावे घोषणाबाजी करणा-यांना नियंत्रणात आणताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली. राहुल गांधींच्या एखाद्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींच्या नावे घोषणाबाजी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी गुजरात निवडणुकीदरम्यान राहुल गांधींच्या प्रचारसभेत मोदींच्या नावे घोषणाबाजी झाली होती. याशिवाय उत्तर प्रदेशातही असंच काहीसं झालं होतं.
निवडणूक आयोगाने अद्याप कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केलेल्या नाहीत. एप्रिल किंवा मे मध्ये निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत राज्यात सत्तेत असणा-या काँग्रेस आणि मुख्य विरोधी पक्ष भाजपाने प्रचार करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते प्रचाराचा मोर्चा सांभाळत आहेत. राहुल गांधी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्यासोबत मिळून अनेक प्रचारसभा घेत आहेत. तर दुसरीकडे, भाजपाकडून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार येदियुरप्पा सलग प्रचारसभा घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही कर्नाटकात प्रचारसभा घेणार आहेत. त्यांचा निवडणूक कार्यक्रम सध्या प्रस्तावित आहे. दरम्यान दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
राहुल गांधी पंजाब नॅशनल बँक घोटाळा आणि राफेल करारावरुन सतत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. अनेक प्रचारसभांमध्ये राहुल गांधींनी पंजाब नॅशनल बँक घोटाळा आणि निरव मोदीचा देश सोडून पळून जाण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. दरम्यान, भाजपा कर्नाटकमध्ये शेतक-यांच्या नावे होणा-या भ्रष्टाचाराचा मुद्दा वारंवार उचलत आहे.
पंजाबनंतर कर्नाटक एकमेव मोठं राज्य आहे जिथे काँग्रेस सत्तेत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी भाजपा पुरेपूर प्रयत्न करत आहे. काही आठवड्यांपुर्वी आलेल्या सर्व्हेत काँग्रेसचं पारडं जड असल्याचं सांगण्यात आलं होतं. काँग्रेस बहुमताने सत्तेत येईल असा अंदाज सर्व्हेतून मांडण्यात आला आहे.